पुन्हा लढण्यास प्रवृत्त करू नका; मंत्री गोविंद गावडे यांचा सरकारला इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2024 08:51 AM2024-05-26T08:51:47+5:302024-05-26T08:52:20+5:30

प्रेरणा दिनी हुतात्म्यांना आदरांजली

do not provoke to fight again minister govind gawde warning to the government  | पुन्हा लढण्यास प्रवृत्त करू नका; मंत्री गोविंद गावडे यांचा सरकारला इशारा 

पुन्हा लढण्यास प्रवृत्त करू नका; मंत्री गोविंद गावडे यांचा सरकारला इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'अनुसूचित जमातीच्या समाजघटकांना केवळ मते मिळवण्यासाठी, राजकारणापुरते जवळ करायचे आणि जेव्हा खरी गरज असेल तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना बाजूला करायचे, हा खरोखरच आपल्या समाजावरील अन्याय आहे, अशी भावना कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल व्यक्त केली. समाजबांधवांनी भविष्याचा विचार करून पुन्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार करण्याची गरज आहे. आपल्यावरील अन्यायासाठी व प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारने पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशारा मंत्री गावडे यांनी दिला.

फोंडा येथील राजीव कला मंदिरामध्ये बाळ्ळी आंदोलनातील हुतात्मे मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. 'या समाजासाठी असलेल्या खात्यातील योजना योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, याला सरकार व खाते जबाबदार आहे. पुढील वर्षी, २०२५ मधील प्रेरणादिनापूर्वी सर्व गोष्टी, मागण्या सरकारने मार्गी लावाव्यात, यासाठी समाजाला पुन्हा लढण्यासाठी प्रवृत्त करू नका,' असेही गावडे यांनी सुनावले.

व्यासपीठावर सावर्डेचे आमदार गणेश गावकर, एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, राज्य एसटी एससी आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर, 'उटा' संघटनेचे नेते प्रकाश वेळीप, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर, 'उटा' संस्थेचे सदस्य दुर्गादास गावडे, विश्वास गावडे, मालू वेळीप, सतीश वेळीप, मोलू वेळीप, दया गावकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार गणेश गावकर म्हणाले, 'मुलांच्या शिक्षणाचा पाया घट्ट करणाऱ्या शैक्षणिक योजना आहेत. त्यांचा फायदा समाजबांधवांनी घ्यायला हवा. आपण घडल्यानंतर समाजाला मदत करणे, हे आपली जबाबदारी आहे. स्वर्गवासी वेळीप व गावकर यांच्यासाठी ही खरी आदरांजली ठरेल. समाजावर जेव्हा संकट येते, तेव्हा एकत्र यावे लागेल. एकजूट होऊन कार्य करावे, तेव्हाच आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील.'

वासुदेव गावकर यांनी सांगितले की, 'एवढ्या वर्षांपासून आपण आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहोत, तरीही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पुन्हा मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला आंदोलनाची गरज भासणार आहे. ट्रायबल भवनची पायाभरणी होऊन अनेक वर्षे झाली, मात्र भवन उभारणीची प्रक्रिया अजूनही पुढे जात नाही. सरकारने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे बिरसा मुंडा योजनाही लवकर मार्गी लावावी.'

याप्रसंगी प्रकाश वेळीप म्हणाले, 'आपल्या मागण्यांसाठी दोन युवकांचा बळी गेला, तरीही सरकार लक्ष देत नाही. आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मागण्या ऐकून घ्यायला हव्या होत्या. राजकीय आरक्षणाचे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र ते पूर्ण केले जात नाही. २०२७ पर्यंत राजकीय आरक्षण मिळायलाच हवे.'

मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वेळीप व गावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. उदय गावकर यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ रेडकर यांनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

'समाजातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने योजना राबवली जात नाही. लोकांना काय द्यायचे आहे हे त्यांना समजत नसेल आणि केवळ पगारासाठी काम करायचे असेल तर त्यांनी ही खाती सोडावीत. अधिकारी योग्य काम करत नसल्याचे दिसते. आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याकडे बारकाईने लक्ष द्यावे,' असे गावडे म्हणाले.

मग प्रेरणा दिनाचा काय उपयोग..?

'आदिवासी कल्याण खाते योजना राबवण्यास अपयशी ठरत असल्यास प्रेरणा दिन सरकारी पातळीवर राबवण्यात काही उपयोग नाही. प्रत्येक प्रेरणा दिनाला आपल्याला तेच दुखणे, त्याच मागण्या करावा लागतात. मग सरकारसोबत 'प्रेरणा दिन' साजरा करून काय फायदा ? मागण्या मांडणे हा आपला अधिकार आहे,' असे मंत्री गावडे म्हणाले.

 

Web Title: do not provoke to fight again minister govind gawde warning to the government 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.