उंडीर प्रकल्पाला विरोध नाही!
By admin | Published: May 19, 2017 02:50 AM2017-05-19T02:50:28+5:302017-05-19T02:54:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला आमच्याकडून होणाऱ्या विरोधाबाबत लोकांची
लोकमत न्यूज नेटवर्क
फोंडा : मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला आमच्याकडून होणाऱ्या विरोधाबाबत लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये थांबवावी, असे आवाहन उंडीर-बांदोडा येथील ग्रामस्थांनी केले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांच्या गावात होऊ घातलेल्या एसटीपी प्लांटला विरोध केला जात आहे. त्यामागे सबळ कारण आहे. विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी संघटनाही स्थापन केलेली आहे. या संघटनेचे निमंत्रक या नात्याने गुरुदास नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे ग्रामस्थांच्या विरोधाबाबत गोमंतकीयांची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही उंडीरवासीय प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला जरूर विरोध करतो; कारण मंत्री किंवा गोवा मलनिस्सारण आणि साधनसुविधा विकास महामंडळाने ग्रामस्थांना विश्वासात न घेताच या ठिकाणी प्लांट बांधण्याचा घाट घातला. पंचायतीनेही विचार व अभ्यास न करता ना हरकत दाखला महामंडळाला दिला. हे करताना सर्व्हे नंबरचा उल्लेख करणेही त्यांनी टाळले. त्यामुळे हे सगळे प्रकार संशयास्पद आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्याच्या हालचालीमुळे ग्रामस्थ एकवटलेले आहेत. नुकतेच पाण्याच्या टाक्या वितरित करण्यासाठी मंत्री ढवळीकर उंडीर येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारल्यानंतर मंत्र्यांनी ग्रामस्थांच्या विरोधाचा मान ठेवत उंडीर येथे एसटीपी प्लांट बांधण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती. असे असतानाही सध्या मंत्री आमच्या विरोधात विविध ठिकाणी कार्यक्रमात बोलताना लोकांची दिशाभूल करत असल्याचे वाचनात येत आहे.
खुद्द मंत्र्यांनी १६ एप्रिल रोजी उंडीर येथे बोलताना एसटीपी प्लांटसाठी सीमेर-आगापूर येथे किंवा अन्य ठिकाणी जागा निश्चित करण्याची ग्वाही दिली होती. तरीही ते बेताल वक्तव्ये करताना आढळतात. यापुढे लोकांची दिशाभूल करण्याची वक्तव्ये मंत्र्यांनी करू नयेत, असे पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, प्रकल्प पूर्णत्वाची शाश्वती नाही. एसटीपी प्लांटबाबत निश्चित धोरण नाही. प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात चालू आहे. एसटीपी प्लांटवरून जर गोंधळ झाला आणि काम बंद पडले, तर जनतेच्या पैशांची नासाडी होणार नाही कशावरून, असा प्रश्नही गुरुदास नाईक यांनी उपस्थित केला आहे.