खबरदार, नेत्यांविरुद्ध बोलू नका! पर्रीकर-बाबूश वादाच्या पार्श्वभूमीवर कडक सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 07:58 AM2024-01-16T07:58:41+5:302024-01-16T07:59:52+5:30

तानावडेंनी मंत्र्यांवर डोळे वटारले.

do not speak against the leaders strict advice in wake of parrikar babush controversy | खबरदार, नेत्यांविरुद्ध बोलू नका! पर्रीकर-बाबूश वादाच्या पार्श्वभूमीवर कडक सल्ला

खबरदार, नेत्यांविरुद्ध बोलू नका! पर्रीकर-बाबूश वादाच्या पार्श्वभूमीवर कडक सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे दोन्ही आमचे भाजपचे अगदी ज्येष्ठ व आदरणीय नेते आहेत. त्यांच्याविरुद्ध कुठल्याच मंत्री व आमदारांनी यापुढे बोलू नये व त्यांच्यावर टीका करण्याचे धाडस करू नये, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल सर्वांना बजावल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली.

तानावडे यांनी प्रथमच पर्रीकर यांच्या विषयावरून मंत्र्यांवर थोडे डोळे वटारले. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात भाजपचे बहुतेक मंत्री, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. 'भाजपची कोअर टीमही उपस्थित होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री सुभाष शिरोडकर, सरचिटणीस दामू नाईक व नरेंद्र सावईकर व्यासपीठावर होते.

तानावडे यांनी पर्रीकर यांचा विषय व्यासपीठावरून मांडला. तानावडे यांनी प्रथमच बाबूश मोन्सेरात यांचे नाव घेतले व यापुढे पर्रीकर यांच्याविरुद्ध टीका करू नये, असा सल्ला दिला. पर्रीकर व श्रीपाद नाईक यांनी गोव्यात भाजप मोठा करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्या नेत्यांवर तुम्ही टीका करू नका. कारण मनोहर पर्रीकर व श्रीपाद नाईक यांचे स्थान खूप वरचे आहे, असे तानावडे म्हणाले.

गाव चलो अभियान

दरम्यान, भाजपने येत्या फेब्रुवारी महिन्यात आठ दिवस गाव चलो अभियान राबविण्याचे ठरवले आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी एक समिती नियुक्त्त करण्यात आली आहे. या समितीवरील आमदार येत्या २० रोजी दिल्लीला जाऊन येतील. तिथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे समितीला मार्गदर्शन करणार आहेत.

मुलांना बोला...

तुमच्या मतदारसंघात जर भाजपच्या बड्या नेत्यांची मुले हस्तक्षेप करत असतील, सरकारवर टीका करत असतील तर तुम्ही त्या मुलांना प्रत्यूत्तर देऊ शकता. मात्र त्यांच्या वडीलांवर तुम्ही टीका करू शकत नाही, असे तानावडे म्हणाले.

बाबूश अनुपस्थित, जेनिफर मोन्सेरात मात्र उपस्थित

काही दिवसांपूर्वी बाबूश मोन्सेरात व उत्पल पर्रीकर यांच्यात स्मार्ट सिटीच्या कामावरून खटके उडाले. नंतर बाबशू यांनी थेट मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका केली. त्यावर आता तानावडे यांनी कडक शब्दांत सर्व मंत्री, आमदारांना सल्ला दिला तेव्हा बाबूश उपस्थित नव्हते. नंतर ते बैठकीला आले होते पण अर्ध्या तासातच ते बैठकीतून निघून गेले गेले. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात ह्या मात्र बैठकीत बसून होत्या. त्यांनी तानावडे यांचे भाषण ऐकले.

 

Web Title: do not speak against the leaders strict advice in wake of parrikar babush controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.