सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 03:21 PM2023-12-10T15:21:40+5:302023-12-10T15:22:22+5:30

लोकांनी प्रकल्पांचे महत्त्व समजून सहकार्य करावे

do not spend government money only on sewerage said chief minister | सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : सरकारकडून पंचायतींना दिला जाणारा निधी हा लोक कल्याणार्थ आहे. त्यामुळे त्याचा वापर केवळ गटार उभारण्यासाठीच न करता चांगले प्रकल्प उभारून गाव समृद्धीकडे कसा जाईल याचा विचार करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

हरवळे पंचायत क्षेत्रात काल, शनिवारी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एमआरएफ शेड, स्वयंपूर्ण मार्केट प्रकल्पाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वयंपूर्ण व्यवसाय सुरू केलेले लुपिन फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास नगराध्यक्ष रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर, संजय नाईक, राजू मलिक, सरपंच अंकुश मलिक, लुपिनचे अधिकारी कला कुंतला, ममता दिवकर, सतीश वाघुंनकर, नंदिनी गावस, ओंकार मांद्रेकर, उल्हास मलिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी लोकसहभाग व पंचायत यांचे सहकार्य अपेक्षित आहे. हरवळे पंचायतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प व स्वयंपूर्ण मार्केट सुरू करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे, तो आदर्श सर्व पंचायतींनी घ्यावा. गावात नवीन उपक्रम, प्रकल्प उभारताना पंचायतीने लोकांना सहभागी करून घ्यावे, तेव्हाच ते काम पूर्णत्वास जाईल.

स्वयंपूर्ण उपक्रम गतिमान होण्यासाठी व विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी गावातील लोकांना हेरून त्यांना मदत करण्यात लुपिनच्या व्यवस्थापनाने केलेले सहकार्य उत्तम आहे. त्यामुळे गावातील होतकरूंना स्वतःचा व्यावसाय उभा करता आला आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन राज्यातील इतर पंचायतींनीही पुणकार घ्यावा. पायाभूत व मानवी विकास साधताना प्रत्येक गाव, घर स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, संजय नाईक यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांना बियाणी व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले.

हरवळे गावातील ३५ जणांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात यश आले आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील इतर पंचायतींनी पुढाकार घेत स्वावलंबी व्हावे. कचरा प्रक्रियेतून खत निर्मिती व त्याच खताची विक्री करण्याचा उपक्रम हरवळे पंचायतीने राबवून आदर्श घातला आहे. स्वयंपूर्ण मित्रांना बरोबर घेऊन प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. केंद्राच्या सहकार्याने राज्यात अनेक प्रकल्प, विकासकामे सुरू आहेत. ग्रामीण भागापर्यंत प्रकल्प पोहोच- वण्याचे काम करत आहोत, त्याला सहकार्य करा, असेही सावंत म्हणाले.

तुम्ही जागा द्या, इमारतीसाठी निधी देऊ

पंचायतींनी लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प उभारावेत. लोकसहभाग असल्यास कोणतेही काम सोपे होऊन जाईल. हरवळे पंचायतीसाठी सुसज्ज इमारतीची गरज आहे. गावकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास भव्य इमारत साकारण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकार विविध माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकार तुमच्या दारी यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

Web Title: do not spend government money only on sewerage said chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.