सॅल्यूट घेणे आवडत नाही : फडणवीस
By admin | Published: May 11, 2015 02:16 AM2015-05-11T02:16:50+5:302015-05-11T02:16:59+5:30
पणजी : सॅल्यूट घेणे आपल्याला आवडत नाही, ती ब्रिटिशांची पध्दत आम्हाला नको, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पणजी : सॅल्यूट घेणे आपल्याला आवडत नाही, ती ब्रिटिशांची पध्दत आम्हाला नको, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी केले. व्हीव्हीआयपी कल्चरची मानसिकता राजकारण्यांनी बदलली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. नक्षलवाद्यांचा धोका असल्याने आपल्याला झेड प्लस सुरक्षा असली तरी सुरक्षा रक्षकांचा एवढा ताफाही आपल्याला नको. सध्या पाच मोटारींचा ताफा आपल्याबरोबर असतो त्यातही कपात करावी, असे फडणवीस म्हणाले.
महिला आर्थिक परिषदेसाठी ते गोव्यात आहेत. ते म्हणाले, ज्या ठिकाणी गरज आहे तेथे आणि जितकी गरज आहे तेवढीच सुरक्षा घेणे योग्य आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर झेड प्लस सुरक्षेमुळे १५ मोटारींचा ताफा दिला. मला इतकी सुरक्षा नकोच. त्यामुळे कमी करून ताफ्यातील मोटारी पाचवर आणल्या. त्या आणखीही कमी कराव्यात, अशी मागणी आहे; परंतु पोलीस तयार नाहीत.
राजकारणात आपण अपघातानेच आलो, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. आपल्याला खरे तर वकील बनायचे होते. १८ व्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. २१ व्या वर्षी पालिका निवडणूक लढविण्याची संधी आली. खरे तर निवडणूक जाहीर झाली तेव्हा वय पूर्ण झाले नव्हते. त्याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी घटनेत ७४ वी दुरुस्ती आणली व त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या त्याचा फायदा झाला. त्यानंतर मागे वळून बघितलेच नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)