धोकादायक ठिकाणी सेल्फी नको, उघड्यावर मद्यपान करु नका; गोव्यात पर्यटकांसाठी नव्याने ॲडव्हायझरी

By किशोर कुबल | Published: April 25, 2023 01:41 PM2023-04-25T13:41:55+5:302023-04-25T13:42:17+5:30

पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे संचालक सुनिल आंचिपाका यांनी म्हटले आहे.

Do not take selfies in dangerous places, do not drink in the open; New advisory for tourists in Goa | धोकादायक ठिकाणी सेल्फी नको, उघड्यावर मद्यपान करु नका; गोव्यात पर्यटकांसाठी नव्याने ॲडव्हायझरी

धोकादायक ठिकाणी सेल्फी नको, उघड्यावर मद्यपान करु नका; गोव्यात पर्यटकांसाठी नव्याने ॲडव्हायझरी

googlenewsNext

पणजी : केरी, तेरेखोल किनाऱ्यावर सेल्पीच्या नादात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन खात्याने पुन्हा ॲडव्हायझरी जारी केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे संचालक सुनिल आंचिपाका यांनी म्हटले आहे. खडकाळ भाग, समुद्रातील खडक इत्यादी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये, समुद्रकिनारे किंवा खुल्या जागेत मद्यपान करणे प्रतिबंधित आहे आणि तो दंडनीय गुन्हा आहे. शॅक्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स इ. यांसारख्या कायदेशीररित्या परवानाकृत आवारात मद्यपान जबाबदारीने केले जाऊ शकते.

कायदेशीर हॉटेल्स, व्हिला किंवा पर्यटन विभागाकडे रीतसर नोंदणी असलेल्या ठिकाणीच खोल्या आरक्षित कराव्यात. वाहतूक विभागाकडे नोंदणी नसलेली, वैध परमिट नसलेली खाजगी वाहने, कॅब, दुचाक्या भाड्याने घेऊ नयेत. वॉटरस्पोर्ट्स आणि रिव्हर क्रूझ (जलसफरी) आरक्षण फक्त नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट किंवा नोंदणीकृत ऑनलाइन पोर्टलवरून करावे. खुल्या जागेत अन्न शिजवण्यास मनाई आहे आणि त्यामुळे कारवाई आणि स्वयंपाकाच्या वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात. पर्यटन क्षेत्रात कचरा टाकण्यास मनाई आहे . समुद्र किना-यावर दुचाक्या किंवा मोटारी आदी वाहने चालविण्यास सक्त मनाई आहे आणि त्यामुळे कठोर कारवाई केली जाईल आणि वाहन जप्त केले जाईल. चालकास अटक केली जाईल.

अंमली पदार्थ विकणाऱ्यांना प्रोत्साहन देऊ नका किंवा कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करू नका, त्यामुळे कठोर दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. मद्यपान किंवा कोणतीही नशा करुन वाहन चालवू नका. अनोळखी व्यक्तींच्या परवानगीशिवाय सेल्फी आणि छायाचित्रे घेऊ नका, विशेषत: सूर्यस्नान करताना किंवा समुद्रात पोहताना इतरांच्या गोपनीयतेचा आदर करा. अवैध खाजगी टॅक्सी भाड्याने घेऊ नका. जादा आकारणी टाळण्यासाठी मीटरच्या भाड्याचा आग्रह धरा.

 ५ हजार ते ५० हजार रुपये दंड!

कोणतीही व्यक्ती, कंपनी, संस्था किंवा इतर कोणतीही संस्था जी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना आढळली आणि मार्गदर्शक तत्त्वे तसेच एसओपीचे पालन करण्यात अयशस्वी ठरली तर त्यांना ५ हजार रुपांपासून ५० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो तसेच भादंसंच्या कलम अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते.

गोव्याचे पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांनी केरी येथील दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले कि,‘ आम्ही यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये एक ॲडव्हायझरी जारी केली होती. लोकहितासाठी ती आता पुन्हा जारी करत आहोत. स्थानिक लोक आणि पर्यटक दोघांनीही त्याचे काटेकोरपणे पालन करावे.’

Web Title: Do not take selfies in dangerous places, do not drink in the open; New advisory for tourists in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.