आरजीला कमी लेखू नका; गोव्याचे राजकारण बदलू पाहणारा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 08:58 AM2023-11-12T08:58:36+5:302023-11-12T08:59:45+5:30

आरजी'ने गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा व प्रभाव दाखवणे सुरु केले आहे. आरजी गोव्याचे राजकारण बदलून टाकू पाहणारा पक्ष बनू पाहतोय. मनोज परब व वीरेश बोरकर यांच्या टीमला याबाबत यश येईल काय, हे कदाचित लोकसभा निवडणुकीवेळी कळेल.

do not underestimate rg a party that wants to change the politics of goa | आरजीला कमी लेखू नका; गोव्याचे राजकारण बदलू पाहणारा पक्ष

आरजीला कमी लेखू नका; गोव्याचे राजकारण बदलू पाहणारा पक्ष

- सदगुरु पाटील

महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. तेव्हा त्यावेळी छोटया सभा व्हायच्या. पुढे पुढे प्रभाव वाढत गेला. नंतरच्या काळात मुंबई, ठाणे व परिसरात शिवसेना एवढी प्रभावी झाली की, १० च्या दशकात युतीचे सरकारही अधिकारावर आले. गोव्यात आरजीची वाटचाल कशा पद्धतीने होईल, हे यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार आहे. गोंयकार आरजीचे भवितव्य लोकसभा निवडणुकीत ठरवतील. या पक्षाने जाहीर केलेय की आपण स्वतंत्रपणे लढणार आहे. म्हणजे काँग्रेस किंवा आम आदमी किंवा इतर कोणत्याही पक्षांसोबत आरजीची युती नसेल. उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात रिव्होल्युशनरी गोवन्सचे स्वतःचे उमेदवार असतील. 

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ९.१० टक्के मते मिळविल्यानंतर आरजीकडे सर्वांचे लक्ष गेले. आरजीने एक उमेदवार पहिल्याच प्रयत्नात निवडूनही आणला, विधानसभेत या पक्षाने खाते उघडल्यानंतर आरजीची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र राजकीय विरोधक व सत्ताधारी भाजप अजूनदेखील आरजीला कमी लेखण्याची चूक करत आहे. आरजीची शक्ती ही सूप्त रुपात विविध मतदारसंघांमध्ये वाढलेली आहे. या पक्षाचे बळ युवकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. त्याकडे काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड आणि भाजपदेखील दुर्लक्ष करू पाहतोय. मात्र लोकसभा निवडणुकीत आरजीसोबत जर जास्त मतदार राहिले तर इतिहास घडू शकतो. आरजीला कमी लेखू नका, कमी लेखता येणार नाही, असा संदेश आरजीच्या सध्या सुरू असलेल्या विविध चळवळींमुळे द्यावा लागत आहे.

आरजीने लोकसभा निवडणुकीवेळी 'एकला चालो' भूमिका घेतली आहे. याबाबत लोकांत विविध पद्धतीने चर्चा सुरु आहे. काँग्रेस समर्थकांना वाटते की आरजी पक्ष भाजपला मदत करतोय, आम आदमी पक्ष तर आरजीला भाजपची बी टीम म्हणतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आरजीला भाजपची बी टीम म्हणत टिंगल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज परब यांनी परवा एक पत्रकार परिषद घेऊन व खाण धंद्याविषयी काही दावे करत गोव्यात खळबळ उडवून दिली आहे. 

पाटकर यांनी परब यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत पोलिस तक्रार केली आहे. अर्थात काय खरे व काय खोटे हा भाग चौकशीनंतर कळून येईलच. मात्र तूर्त आरजीने गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा व प्रभाव चांगल्या पद्धतीने दाखवणे सुरू केले आहे. हे मान्य करावे लागेल. पक्ष नवा असतो तेव्हा जास्त धडपड करावी लागते. काहीवेळा ही धडपड करताना तरुण नेत्यांकडून चुका होतात. आरोपांचे फुगे फुटतात. मनःस्तापही होतो. दोष व अपमान सहन करावा लागतो. काही अपमान तर गिळावे लागतात. आरजीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या या स्थितीतून जात आहेत. असे त्यांच्याशी बोलताना जाणवते, मात्र राजकारणात नव्या पक्षांना सतत लोकांचे लक्ष स्वतः कडे वळवत ठेवावे लागते. आरजी सध्या यात यशस्वी होत आहे. गोव्यात कुठेही डोंगरफोड असो, परप्रांतियांची अतिक्रमणे असोत किंवा सरकारी भ्रष्टाचार असो, त्याविरुद्ध आरजी आवाज उठवत आहे. आरजीचे कार्यकर्ते भोमपासून सासष्टीपर्यंत व पुढे खोला काणकोणपर्यंतच्या सर्व चळवळींमध्ये भाग घेत आहेत.

आरजीचे अस्तित्व यातून दिसून येतेय. आता याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवेळी काय होईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र आरजी हा गोव्याचे राजकारण बदलून टाकू पाहणारा पक्ष बनू पाहतोय, मनोज परब व वीरेश बोरकर यांच्या टीमला याबाबत यश येईल काय हे कदाचित लोकसभा निवडणुकीवेळी कळेल. समजा लोकसभेवेळी जास्त मते मिळाली नाहीत, तर आरजीमध्ये मोठी फूट पडू शकते; हे देखील तेवढेच खरे आहे. काहीजण नेते होण्यासाठी किंवा आमदार होण्यासाठीच आरजीच्या आश्रयाला येत असतात. जे निरपेक्ष भावनेने येतात, तेच आरजीसोबत टीकतात, असे गेल्या दोन वर्षात तरी दिसून आले.

मनोज परब सातत्याने जाहीर करत आहेत की आरजी ही हप्तेबाज संघटना किंवा पार्टी नव्हे. आरजीला कुणी विकत घेऊ शकत नाही, आम्हाला गोंयकारांचे हितरक्षण करायचे आहे. अर्थात परब यांनी सत्तरीत आयआयटीविरोधी आंदोलन यशस्वी करून दाखवले. अन्य काही छोटया छोटया चळवळीतही आरजीचे कार्यकर्ते अजून तरी दबावाला बळी पडल्याचे दिसत नाही. आम आदमी पक्ष पाच-सात वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने काम करत होता, त्याच पद्धतीने आरजीने गोव्यात काम चालविले आहे. आपचे गोव्यातील नेते व पदाधिकारीही स्वतःच्या पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी झटत आहेत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांचा प्रयत्नही अलिकडे वाढलाय. प्रत्येक राजकीय पक्ष जोर वाढवतोय. 

भाजप आता आंदोलने करू शकत नाही. कारण तो पक्ष सत्तेत आहे. भाजपचे काही आधीचे व काही आयात कार्यकर्ते पक्षाच्या आश्रयाला राहून स्वतःचे व्यवसाय वाढवतात. काहीजण सत्ता आहे म्हणून भाजपसोबत आहेत. मात्र काही भाजप कार्यकर्ते निष्ठेने पक्षासाठी झोकून देऊन काम करत आहेत. अशा बिचाऱ्या कार्यकत्यांना मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे निमंत्रण व पासही मिळत नाही. समारोप सोहळ्याला खुर्च्या रिकाम्या राहतात. तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. आरजी व आप किंवा आरजी व काँग्रेस यांची युती होऊच शकत नाही. कथित इंडिया आघाडीचा भाग आरजी बनूच शकत नाही, कारण आरजीला स्वतःचे अस्तित्व उभे करायचे आहे. आताच जर आरजीने काँग्रेस किंवा केजरीवाल यांच्या आपसोबत युती केली तर आरजीचे अस्तित्वच संपून जाईल. आरजीचे वेगळेपण संपून जाईल. सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, हा विचार आदर्श वाटतो. 

भाजपमधील काही मस्तवाल आमदार, मंत्र्यांना वठणीवर आणण्यासाठी विरोधकांची एकी गरजेची आहे, असा विचार राष्ट्रीय स्तरावर जोर धरत आहे. मात्र आरजीसारखे छोटे पक्ष युतीच्या गळाला लागले तर संपून जातील. पूर्वी आम्हालाही वाटायचे की- आरजी स्वतंत्र खेळी खेळून खिस्ती मतांमध्ये व एकूणच काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडत आहे. तसा उल्लेख यापूर्वी लेखनात आम्ही केलादेखील आहे. मात्र आरजीचे वेगळेपण टिकविण्यासाठी लढाऊ बाणा टिकविण्यासाठी व स्वतःचे स्थान टिकविण्यासाठी स्वतंत्र वाट धरावीच लागेल. 

आरजी लोकसभा निवडणुकीवेळी ख्रिस्ती व हिंदू अशा दोन्ही मतांमध्ये फूट पाडू शकतो. काँग्रेसचे नुकसान थोडे अधिक होईल, पण भाजपचीही हानी करण्याएवढे बळ तूर्त आरजी स्वत:कडे जमवू लागला आहे. असा फिल येतोय. लोकांना सतत रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष आपला वाटतो. मात्र त्याचे मतामध्ये रुपांतर करण्यासाठी एक क्रेडीबल नेता, विश्वासू चेहरा पक्षाला हवा असतो. मनोहर पर्रीकर यांच्या रूपात भाजपला तसा चेहरा ९० च्या दशकात लाभला होता. आरजीला राज्यभर प्रभाव निर्माण करू शकेल असे नेतृत्व लाभलेय का, याचे उत्तरही कदाचित लोकसभा निवडणुकीवेळी मिळेल. 

काँग्रेसकडे आजच्या घडीस तसा चेहरा नाही. दिगंबर कामत कॉंग्रेसमध्ये असतानाही काँग्रेसला ते जमले नाही. आपचे अमित पालेकर किंवा काँग्रेसचे अमित पाटकर, युरी आलेमाव यांना अजून कष्ट घ्यावे लागतील. युरी आलेमान हे तर आपल्याच कौटुंबिक उपक्रमांमध्ये बिझी असतात. त्यांनी गोवा अजून आहे कसा ते देखील पूर्ण फिरून पाहिलेले नाही. परवा सावर्डेत काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनोज परब यांची प्रतिमा जाळली. मात्र आरोप केला म्हणून प्रतिमा जाळणे हा उपाय नव्हे. आरोप खोटे ठरविण्यासाठी आणखी मार्ग आहेत. कागद जळतो,
विचार जळत नसतात.

 

Web Title: do not underestimate rg a party that wants to change the politics of goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.