'आयआयटी'ला विरोध का करतात समजत नाही! विधानसभेत दिगंबर कामत यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:07 AM2023-08-01T09:07:38+5:302023-08-01T09:08:54+5:30
शिक्षण खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी कामत बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: गोव्यासाठी आयआयटी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मग 'आयआयटी'ला इतका विरोध का होत आहे, हेच समजत नसल्याची खंत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत व्यक्त केली.
शिक्षण खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी कामत बोलत होते. आयआयटी प्रकल्पासंदर्भात जर काही जमिनीचा विषय असेल तर तो त्वरित सोडवून सदर प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली. कामत म्हणाले, की गोव्यात एनआयआयटी कॅम्पस् कार्यरत आहे; मात्र हा एनआयआयटी कॅम्पस् होण्यासही बरीच वर्षे लागली. असेच सध्या आयआयटी प्रकल्पाबाबत होत आहे.
गोव्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आयआयटी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहे. गोव्यात आयआयटी नसल्याने अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी गोव्याबाहेर जात आहेत. त्यामुळे ही सुविधा गोव्यात सुरू झाली तर त्याचा फायदाच होईल; मात्र सध्या अनेकजण या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सांगेतील लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला. हा प्रकल्प तेथे झाला असता तर सांगेचे नाव शिक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय नकाशावर आले असते; मात्र या प्रकल्पाला इतका विरोध का होत आहे, हेच समजत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
आयआयटी झाले तर शैक्षणिक हब म्हणून उभारी घेत असलेल्या गोव्याला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्यास जर काही जमिनीं बाबत अडचण येत असेल तर तो मार्गी लावून आयआयटी चालीस लावावा.
सरकार राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवीत आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक त्या सुविधा तयार करणे; तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देणेही महत्त्वाचे असल्याचे कामत यांनी सांगितले.