यंदा ‘नीट’ नकोच!
By admin | Published: May 3, 2016 01:54 AM2016-05-03T01:54:46+5:302016-05-03T01:58:04+5:30
पणजी : वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षा येत्या शैक्षणिक वर्षात लागू न करता २0१७च्या
पणजी : वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षा येत्या शैक्षणिक वर्षात लागू न करता २0१७च्या शैक्षणिक वर्षापासून लागू करावी, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका गोवा सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली. या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.
अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. राज्यात जीसीईटीला नोंदणी केलेल्या ५६00 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असल्याने सरकार या प्रश्नावर गंभीर आहे. अंतिम पर्याय म्हणून ‘नीट’ची जुलैमध्ये एकच परीक्षा असावी, असेही सरकारचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एमबीबीएस, बीडीएस तसेच पदव्युत्तर प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील एनईईटी (नीट) परीक्षा बंधनकारक असल्याचे शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहेत. गोमेकॉ व दंत महाविद्यालय प्रवेशासाठी जीसीईटी परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी केली होती; मात्र ऐनवळी राष्ट्रीय स्तरावरील एनईईटी परीक्षा लादण्यात आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही ‘नीट’ परीक्षा यंदा नकोच, अशी भूमिका घेतली आहे.
सीबीएसईने नीट परीक्षेसाठी दोन तारखा जाहीर केल्या. त्यानुसार १ मे रोजी पहिल्या टप्प्यातील परीक्षा झाल्या. २४ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा होणार आहे. येत्या १0 व ११ मे रोजी जीसीईटी परीक्षा होणार असून परीक्षा तोंडावर असताना न्यायालयाचा हा आदेश आला. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. (प्रतिनिधी)