Miracle: डॉक्टरही हादरले! खराखुरा ‘पाषाण हृदयी’ माणूस सापडला; कुठे ते जाणून तुम्हालाही बसेल शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 04:48 PM2021-02-09T16:48:57+5:302021-02-09T16:49:25+5:30

Goa News: शवविच्छेदनावेळी उघड : गोमेकॉचे डॉ. भारत श्रीकुमारच्या संशोधनाला पुरस्कार

doctor shocked! A real 'stone hearted' man was found in Goa | Miracle: डॉक्टरही हादरले! खराखुरा ‘पाषाण हृदयी’ माणूस सापडला; कुठे ते जाणून तुम्हालाही बसेल शॉक

Miracle: डॉक्टरही हादरले! खराखुरा ‘पाषाण हृदयी’ माणूस सापडला; कुठे ते जाणून तुम्हालाही बसेल शॉक

googlenewsNext

- वासुदेव पागी
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : निर्दयी माणसाला दगडाच्या काळजाचा माणूस किंवा पाषाण हृदयी वगैरे संबोधले जाते. खरोखरच हृदय पाषाणी असते का ? असे कुणी विचारल्यास त्याची लोक थट्टा करतील. परंतु दगडाच्या हृदयाचा माणूस सापडला आहे आणि तोही गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाला. त्या विषयावर कटक - ओडिशा येथील परिषदेत सादर केलेल्या डॉ. भारत श्रीकुमार यांच्या संशोधन पेपरांसाठी पहिला क्रमांक मिळाला आहे.


डॉ. भारत कुमार हे गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागात आणलेल्या एका भिकाऱ्याचा शवविच्छेदनाचे काम करीत असताना त्यांना एक विचित्र गोष्ट लक्षात आली. त्याचे हृदय खूपच कठोर असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे हे प्रकरण त्यांनी केवळ शवविच्छेदन करून अहवाल देण्यापुरता मर्यादित न ठेवता अभ्यासासाठी (केस स्टडी) म्हणून तो विषय हाताळायचे त्यांनी ठरविले. त्यांना साथ दिली ती त्यांचे सहकारी डॉ. शेरली सुआरीस आणि डॉ. आंद्रे फर्नांडिस यांनी.


या विषयावर अभ्यास करताना त्यांना आढळून आले की, कॅल्सियमचे एकावर एक असे थर साचून त्या मृत व्यक्तीचे हृदयच कॅल्सियमचा दगड बनला होता. एरव्ही खडे हे केवळ मूत्रपिंडात, वाहिन्यात किंवा ब्लॅडरमध्ये वगैरे होतात, असा एक समज होता तो या प्रकरणामुळे फोल ठरला आहे. या संशोधनामुळे गोमेकॉसह एकंदरीत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीच अवाक् झाली आहेत. या विषयावरील संशोधन पेपर डॉ. श्रीकुमार यांनी २३  ते  २४ जानेवारी रोजी कटक येथे झालेल्या परिषदेत सादर केले होते. त्यांना मिळालेले प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे स्वरूप हे डॉ. जगमोहन शर्मा स्मृती ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती आणि डॉ. मनमोहन रेड्डी रोख बक्षीस १० हजार रुपये असे आहे.



गोमेकॉसाठी हे यश अभिमानास्पद
भारतीय फॉरेन्सिक मेडिसिन अकादमीतर्फे डॉ. श्रीकुमार यांचे अभिनंदन केले आहे. गोवा फॉरेन्सिक विभागाला नव्हे तर गोमेकॉसाठीही हे यश अभिमानास्पद आहे. संशोधन कामाला यामुळे प्रोत्साहन मिळणार असल्याचे अकादमीचे प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांनी म्हटले आहे. अकादमीचे मुख्यालय गोव्यात आहे. डॉ. श्रीकुमार यांनी या यशाचे श्रेय या संशोधन कामातील त्यांचे सहकारी डॉ. शेरली सुआरीस आणि डॉ. आंद्रे फर्नांडिस यांनाही जात असल्याचे लोकमतला सांगितले.

Web Title: doctor shocked! A real 'stone hearted' man was found in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.