पणजीमध्ये मुलांना चावणाऱ्या कुत्र्याच्या मालकाला अटक
By वासुदेव.पागी | Published: August 22, 2023 04:50 PM2023-08-22T16:50:27+5:302023-08-22T16:50:47+5:30
लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना गंभीररित्या जखमी करणाऱ्या रॉटविलर जातीच्या कुत्र्याच्या ताळगाव येथील मालकाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे.
पणजी: लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना गंभीररित्या जखमी करणाऱ्या रॉटविलर जातीच्या कुत्र्याच्या ताळगाव येथील मालकाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे.
५ वर्षे वयाचा मुलगा आणि त्याची ६ वर्षांची बहीण यांच्यावर रॉटविलर जातीच्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आल्यामुळे वातावरण बरेच तापले असून संतप्त ताळगाव वासियांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. पणजी पोलिसांनी त्या नुसार कारवाई करताना कुत्र्याचे ताळगाव येथील मालक माधवराव चव्हाण याला अटक केली आहे.
सोमवारी लोकांनी कुत्र्याच्या मालकाला घेराव घालून जाब विचारला होता. ताळगावचे सरपंच जानू रोजारियो यांनीही या बाबतीत आक्रमक भुमिका घेतली होती. माधवराव यांनी या घटनेबद्दल माफी मागितली होती आणि कुत्र्यांना आठवडाभरात इतर ठिकाणी हलविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच ज्या मुलांना कुत्र्यांनी जखमी केले त्या मुलांच्या औषधोपचाराचा खर्चही देण्याचे त्यांनी कबूल केले होते.
औषधोपचाराचा खर्च करून तसेच माफी मागूनही माधवराव कारवाईपासून बचावू शकत नाही असेही लोकांनी सोमवारीच सांगितले होते.
कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे दोन लहान भावंडांचा जीव धोक्यात पडल्यामुळे या घटनेची गोवा राज्य बाल संरक्षण आयोगानेही घेतली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात कारवाई केली जाणारच असे आयोगाचे आयुक्त पिटर बॉर्जीस यांनी म्हटले आहे.
पोलिसांनीही नेमकी तशीच भुमिका घेताना त्याला अटक केली आहे. दरम्यान कुत्र्यांनी चावा घेऊन जबर जखमी करण्यात आलेली लहान भावंडांची प्रकृती आता स्थीर असून ती धोक्याबाहेर आल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली. दोघांवरही गोमेकॉत उपचार सरू आहेत.