गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 12:58 PM2019-07-24T12:58:20+5:302019-07-24T12:58:27+5:30
गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे
पणजी : गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ती मोठी डोकेदुखी ठरली आहे. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार गोव्यात रेबिजचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लोकांना ते मोठे तापदायक ठरले आहे. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यात १०,३४० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची नोंद आरोग्य खात्यात झालेली आहे. ही आकडेवारी पाहता दर दिवशी साधारणपणे ६८ जणांना श्वानदंश झाल्याचे स्पष्ट होते. आरोग्य खात्याकडे एवढी नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात त्याहून आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.
गोवा पर्यटनस्थळ आहे. किनाऱ्यांबरोबरच येथील मंदिरे, चर्च तसेच अन्य प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर देशी-विदेशी पाहुण्यांची नेहमीच गर्दी असते. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पर्यटकांनाही होत आहे. किनाऱ्यांवर पडून राहिलेला कचरा तसेच अस्वच्छता यामुळे भटकी कुत्री किनाऱ्यावरदेखील फिरताना दिसतात. किनार्यांवर पर्यटकांनाही त्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. सरकारची अधिकृत माहिती सांगते की रेबिजचे एकही प्रकरण गेल्या वर्षभरात राज्यात नोंद झालेले नाही.
गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीम सरमोकादम यांच्या मते ठिकठिकाणी वाढलेल्या कचऱ्यामुळे भटकी कुत्री वाढलेली आहेत. कत्तलखान्याचे टाकाऊ साहित्य तसेच कचरा अनेकदा उघड्यावर फेकला जातो. त्यामुळे कुत्री तेथे आढळतात आणि त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी गोव्यात येतात. हे पक्षी अंडी घालतात. ही अंडी नष्ट करण्याचे काम कुत्री करत असतात असे सरमोकादम म्हणाले. राज्यात पोपट तसेच अन्य पक्षांचे प्रमाण घटण्याचे कारण काय याचा शोध घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. जैवविविधता मंडळाचे सदस्य मारियानो फर्नांडिस यांच्या मते विदेशी पर्यटक गोव्यात येतात. पाच- सात महिने वास्तव्य करून राहतात. हे पाहुणे कुत्री पाळतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. अशा कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गोवा कॅन या ग्राहक चळवळीचे संस्थापक रोलँड मार्टिन यांच्यामध्ये उघड्यावरफेकलेला कचरा हेच कुत्र्यांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. कचरा व्यवस्थापन योग्यरीत्या झाले तर ही समस्याच राहणार नाही, असे ते म्हणाले.