सलग सुट्ट्यांमुळे गोव्यात देशी पर्यटकांचे तांडे; कॅसिनो, किनारे गर्दीने फुलले
By किशोर कुबल | Published: August 14, 2023 07:47 PM2023-08-14T19:47:44+5:302023-08-14T19:47:51+5:30
पर्यटकांच्या वाहनांमुळे किनारी भागांमध्ये तसेच राजधानी शहरातही काल ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
पणजी : विकएंडला जोडून स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आल्याने गोव्यात देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून किनारे, चर्च, मंदिरे, जलसफरी घडवून आणणाय्रा बोटी, कॅसिनोंवर प्रचंड गर्दी उसळली आहे.
पर्यटकांच्या वाहनांमुळे किनारी भागांमध्ये तसेच राजधानी शहरातही काल ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. स्वातंत्र्यदिनानिमित्त जुन्या सचिवालयासमोर झेंडावंदनाचा राज्यव्यापी कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक वळविण्यात आली. कॅसिनोंमध्ये येणाय्रा पर्यटकांची वाहने त्यामुळे तुंबली. सोमवारी दिवसभर या भागात वाहतूक कोंडी दिसून आली. बसस्थानकापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
शनिवार, रविवारी सुट्टी असते. आज मंगळवारी स्वातंत्र्यदिन आल्याने सोमवारची रजा टाकून अनेकांनी गोवा गाठला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरातमधील पर्यटकांची संख्या जास्त आहे. सलग सुट्ट्यांमुळे विमानभाडेही सुमारे पाच पटींनी वाढले आहे. गोवा-मुंबई विमान तिकिटासाठी १० हजार मोजावे लागल्याचे काहीजणांनी सांगितले. अनेक गोवेकरांनीही सोमवारी रजा टाकून शिर्डी, धर्मस्थळ, तिरुपती आदी धार्मिक स्थळांवर तसेच अन्य ठिकाणी सहली केल्या. दरम्यान, गोव्याचे पर्यटन आता बारमाही झाले आहे. पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत असतात.