डॉमनिक, जुआंव यांच्या तडीपारीचा आदेश कायम
By पूजा प्रभूगावकर | Published: April 26, 2024 05:20 PM2024-04-26T17:20:15+5:302024-04-26T17:20:26+5:30
धार्मिक सलोखा बिघडवत असल्याप्रकरणी तडीपार करण्याची शिफारस गोवा पोलिसांनी केली होती.
पणजी : उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणारी पास्टर डॉम्निक डिसोझा व जुआंव मास्कारेन्हस यांनी दाखल केलेली याचिका मुख्य सचिवांनी फेटाळून लावली आहे.
त्यामुळे डॉम्निक व जुआंव यांच्यावरील तडीपाराची कारवाई कायम राहील. सडये-शिवोली येथील फाइव्ह पिलर ही संस्था ते चालवतात. यात लाेकांचे बेकायदेशीरपणे धर्मांतर केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉम्निक डिसोझा व जुआंव मास्कारेन्हस यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक सलोखा बिघडवत असल्याप्रकरणी तडीपार करण्याची शिफारस गोवा पोलिसांनी केली होती.
या शिफारशीनुसार दोघांनाही उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता. तडीपारीचा आदेश रद्द करावा, अशी मागणी करून डॉम्निक डिसोझा व जुआंव मास्कारेन्हस यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती.