गोव्यातील दोनापॉल जेटी नूतनीकरणासाठी सहा महिने बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 02:32 PM2019-07-04T14:32:45+5:302019-07-04T14:40:23+5:30

बॉलिवूडच्या चित्रिकरणासाठी हक्काचे स्थान असलेली गोव्यातील दोनापॉल जेटी गेले सहा महिने बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना हिरमुसले होऊन दूरुनच दर्शन घेऊन परतावे लागते.

dona paula jetty Six-month shutdown for the renovation in goa | गोव्यातील दोनापॉल जेटी नूतनीकरणासाठी सहा महिने बंद 

गोव्यातील दोनापॉल जेटी नूतनीकरणासाठी सहा महिने बंद 

ठळक मुद्देबॉलिवूडच्या चित्रिकरणासाठी हक्काचे स्थान असलेली गोव्यातील दोनापॉल जेटी गेले सहा महिने बंद आहे. स्मार्ट सिटीच्या उपक्रमांतर्गत या जेटीचे काम हाती घेण्यात येणार आहे. जेटीचा 50 मीटरनी विस्तार केला जाईल. महापौर उदय मडकईकर यांनी जेटीचे काम रखडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पणजी - बॉलिवूडच्या चित्रिकरणासाठी हक्काचे स्थान असलेली गोव्यातील दोनापॉल जेटी गेले सहा महिने बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना हिरमुसले होऊन दूरुनच दर्शन घेऊन परतावे लागते. जीवाचा गोवा करण्यासाठी येणारे पाहुणे तूर्त एका चांगल्या पर्यटन स्थळाला मुकले आहेत.

‘एक दुजे के लिए’ तसेच अन्य हिंदी सिनेमांचे जेथे चित्रीकरण जेटीवर झालेले असून या जेटीवरील दृश्य पावसाळ्यात आणखीनच विहंगम आणि लोभसवाणे असते. मान्सूनमध्ये उंच लाटा येऊन जेटीवर आदळतात आणि पाण्याचे तुषार उडतात. पाण्याच्या या तुषारात न्हावून निघण्याचा आनंद औरच असतो. त्यामुळे पावसाळ्यातही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असायची. सध्या फाटक घालून जेटीकडे जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. या जेटीचे काम गेले रखडले असून पर्यावरणीय परिणाम अभ्यास अहवालासाठी रखडले आहे. मोडकळीस आलेल्या या जेटीचा विस्तार करण्यात येणार असून जेटी असुरक्षित बनल्याने सध्या बंद आहे. 

स्मार्ट सिटीच्या उपक्रमांतर्गत या जेटीचे काम हाती घेण्यात येणार आहे. जेटीचा 50 मीटरनी विस्तार केला जाईल. त्यामुळे पर्यावरणीय परिणाम अभ्यास अहवाल आवश्यक आहे. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी लि. चे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘निवडणूक आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडली होती. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने जलदगतीने पर्यावरणीय परिणाम अभ्यास करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार हा अहवाल तयार करण्यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. या निविदा उद्या खोलून कंत्राट दिले जाईल. अहवाल हाती आल्यानंतर सीझेडएमएचे परवाने मिळताच लगेच काम हाती घेतले जाईल. 

काँक्रिटीकरण नको - राहुल देशपांडे 

आघाडीचे वास्तु रचनाकार राहुल देशपांडे म्हणाले की, ‘नैसर्गिक सौंदर्य नष्ट करुन तेथे काँक्रिटीकरण करू नये. मार्ट सिटीच्या कामांचे सादरीकरण झाले तेव्हा काँक्रिटीकरणाला आम्ही आक्षेप घेतला होता. तेथे सरकते जिने येणार आहेत. एकूणच जो आराखडा आम्हाला त्यावेळी दाखवण्यात आला तो आम्हाला अमान्य होता. या कामासाठी कन्सल्टंट परप्रांतीय आणले आहेत. त्यांना गोव्याचा वारसा, अभिरुची माहीत नाही. हा आराखडा बदलावा, असे आम्ही सूचविले होते.’ जेटीच्या काँक्रिटीकरणाला स्थानिक लोकांचाही विरोध आहे. 

दहा वर्षातच असुरक्षित कशी ? - महापौरांचा सवाल 

महापौर उदय मडकईकर यांनी जेटीचे काम रखडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पर्यटक तर वंचित झालेच, शिवाय तेथे जलक्रीडा घेणाऱ्यांचाही धंदा बसला. पर्रीकर मुख्यमंत्री असताना साधन सुविधा विकास महामंडळाने या जेटीचे नूतनीकरण केले होते. दहा वर्षातच ती असुरक्षित कशी काय बनली. एवढे निकृष्ट दर्जाचे काम केले होते काय? असा सवाल त्यांनी केला. या जेटीचे नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. 

 

Web Title: dona paula jetty Six-month shutdown for the renovation in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा