देवांवर टिप्पणी नको, राज्यात शांतता राखून ठेवावे: अखिल गोवा मुस्लिम जमात संघटना
By समीर नाईक | Published: February 1, 2024 03:58 PM2024-02-01T15:58:32+5:302024-02-01T15:58:47+5:30
अखिल गोवा मुस्लिम जमात संघटनेचे अध्यक्ष बशीर अहमद शेख यांनी व्यक्त केले आहे मत
समीर नाईक, गोवा-पणजी: सोशल मीडियावर इतर धर्माच्या देवांवर काही शेरेबाजी करून धार्मिक भावना दुखावल्याच्या ज्या घटना सध्या राज्यात होत आहे, त्या खुप चिंताजनक आहे. देवांवर टिप्पणी करणे हा गंभीर मुद्दा असून प्रत्येकाने एकमेकांच्या विश्वासाचा आदर राखला पाहिजे. एकमेकांच्या परंपरा आणि श्रद्धा यांचा परस्पर आदर हा कोणत्याही बहुवचन समाजाचा सुसंवादी आणि शांततापूर्ण अस्तित्वाचा पाया आहे, असे मत अखिल गोवा मुस्लिम जमात संघटनेचे अध्यक्ष बशीर अहमद शेख यांनी व्यक्त केले.
शेख यांनी याबाबत एक खास संघटनेच्या वतीने परीपत्रक जारी करत अशा धार्मिक भावना दुखावणाऱ्या गोष्टींचा निषेध केला. तसेच राज्यात शांतता राखून ठेवण्याचे आवाहन शेख यांनी केले. इतरांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर पोलीस खात्याने त्वरीत कारवाई करावी. दोषींना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून वेळ वाया करु नये. यातून तणाव वाढण्यापासून वाचणार आहे. सोशल मीडिया पोस्टवर जमावाच्या हिंसाचाराचे आणि मारहाणीचे व्हायरल झालेले व्हिडिओ अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत. कायदा हातात घेणाऱ्या लोकांच्या अशा कृत्यांचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. जमावबंदीचा वाढता कल आणि लोकांनी कायदा हातात घेणे हे समाजासाठी धोकादायक आहे. समुदायांमध्ये तणाव वाढवण्यापेक्षा गुन्हेगारांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे आणि तपास करण्याचे काम आपण अधिकाऱ्यांवर सोडले पाहिजे, असे संघटनेतर्फे जारी केलेल्या परीपत्रकात म्हटले आहे.