विचलीत होऊ नका, मनोज परबची आरजींना भावनिक हाक
By वासुदेव.पागी | Published: November 30, 2023 04:29 PM2023-11-30T16:29:56+5:302023-11-30T16:31:57+5:30
मनोज परब यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्या आहेत.
पणजी: रिवोल्युशनरी गोवन्सच्या विरोधात सुरू असलेली बदनामीची मोहीम पाहून बिथरून जाऊ नका आणि आपल्या मार्गावरून ढळू नका, आपल्या निश्चयावर अढळ राहून काम करा अशी भावनिक हाक रिवोल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली आहे.
मनोज परब यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्या आहेत. व्हिडीओत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. आरजीला बदनाम करण्यासाठी आपल्या विरोधकांकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. विरोधकांच्या काव्याला बळी पडू नका. त्याकडे दुर्लक्ष करा. शांततेच्या मार्गाने चालू असलेली चळवळ चालूच ठेवा. आंदोलन थांबता कामा नये. कुणीही किती आरोप करतात ते करू दे. त्याचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
आरजी कार्यकर्ते आपल्या एका शब्दासाठी मोठी जोखीम घेऊन कसे झटतात हे सांगताना परब आपले अश्रू लपवू शकले नाहीत.
रोजगाराची समस्या, घराची समस्या , कर्जांचे डोंगर हे सर्व सोसतानाच आरजीसाठी काम करणारे कार्यकर्ते आरजीची ताकद असल्याचे ते म्हणाले. आपल्या पक्षाकडे केवळ दीड लाख रुपये शिल्लक असून पक्षाच्या कार्यालयाचे भाडे थकले आहे, कार्यक्रम करण्यासाठी पैसे नाहीत, कार्यकर्त्यांना चहा पाणी देण्यासाठीही पैसे नाहीत. परंतु अशा परिस्थितीतही आपले काम थांबणार नाही असे त्यांनी सांगितले. मोठे बिल्डर आणि स्क्रॅपयार्डवाले मोठ्या देणग्या देण्यासाठी तयार आहेत, परंतु आपला पक्ष कधीही तत्वांशी तडजोड करणार नाही असे त्यांनी या व्हिडिओत सांगितले.