थंडी ताप अंगावर काढू नका; आरोग्यखात्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2023 02:54 PM2023-12-08T14:54:17+5:302023-12-08T14:54:41+5:30
कोरोनानंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढविली आहे.
-नारायण गावस
पणजी: कोरोनानंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणेलाही अलर्ट देण्यात आला आहे. जगाच्या इतर भागांतील मुलांमध्ये श्वसनसंस्थेच्या संसर्गामध्ये नुकतीच झालेली वाढ पाहता आरोग्य सेवा संचालनालयाने त्याचे निरीक्षण सुरू ठेवले आहे.
आराेग्य अधिकारी व महामारीतज्ञ डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आराेग्य खाते या विषयी जागरुक आहेत. विदेशातील या घडामोडीवर पाळत ठेवली जात आहे. बालरोगातील रुग्णांमध्ये अचानक वाढ किंवा प्रौढांमध्ये ताप किंवा खोकल्याची कोणतीही असामान्य वाढ यावर आम्ही नियंत्रण ठेवत आहोत.
तात्काळ तपासणी केली जाते
अशी लक्षणे आढळलेल्या रुग्णांची नियमित चाचण्या घेतल्या जात आहेत. अद्याप कोणतीही संशयित प्रकरणे मिळालेली नाहीत. डॉ. सूर्यवंशी यांनी नागरिकांना ताप आणि सतत खोकला असल्यास त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, जेणेकरून त्यांची तपासणी करता येईल, असे आवाहन केले आहे.
राज्यात सध्या हिवाळी हंगाम सुरु झाला असून वायरल थंडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे लहानापासून पुरुषामध्ये संसर्गाची लक्षणे जास्त आढळून येत आहेत. पण याचा धाेका नाही लाेकांनी सर्दी खाेकल अंगावर न काढता तसेच वेळ वाया न घालवता डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. याचे प्रमाण जास्त वाढणार नाही याची दखल प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
मुलांमध्ये जास्त वायरल थंडीची लक्षणे
सध्या शालेय मुलांमध्ये ही जास्त वायरल थंडी दिसून येत आहे. सकाळी लवकर उठून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना थंडीचा सामना करावा लागतो. तसेच थंडी, उष्णता, दमट अशा मिश्रीत वातावरणामुळे श्वासनावर परिणाम जाणवतात अशा विविध कारणामुळे थंडीचे प्रकरणे वाढत आहे.