गोव्यात उद्योगांना दुप्पट चटई निर्देशांक; मंत्री मॉविन गुदिन्हो यांची घोषणा
By किशोर कुबल | Published: January 29, 2024 07:26 PM2024-01-29T19:26:59+5:302024-01-29T19:27:10+5:30
गोव्यात उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोसाहन मिळावे तसेच अस्तित्त्वात असलेल्या उद्योगांना विस्तारासाठी वाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मॉविन यांनी सांगितले.
पणजी : गोव्यात अस्तित्त्वात असलेल्या उद्योगांना दुप्पट चटई निर्देशांक (एफएआर) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून यामुळे कारखान्यांचे विस्ताराचे काम सोपे झाले आहे.
‘इन्वेस्ट २०२४’ परिषदेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली. गुंतवणूकदारांच्या या परिषदेत दोन महत्त्वाचे समझोता करारही बड्या कंपन्यांनी सरकारकडे केले. एक समझोता करार सीआयआयचे अध्यक्ष तथा टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लि,चे चेअरमन आर. दिनेश यांच्याकडेही झालेला आहे. याव्दारे एक हजार नोकय्रा निर्माण होणार असल्याचे मॉविन यांनी सांगितले.
गोव्यात उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोसाहन मिळावे तसेच अस्तित्त्वात असलेल्या उद्योगांना विस्तारासाठी वाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मॉविन यांनी सांगितले. मॉविन म्हणाले की, ‘ सरकारने आता नवीन औद्योगिक धोरण व वेअरहाउसिंग धोरण आणले त्याचबरोबर औद्योगिक विकास महामंडळानेही काही नियम शिथिल करुन इज ॲाफ डुइंग बिझनेसच्या बाबतीत सुटसुटीतपणा आणला आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत.
आयटी हॅबिटॅट दोनापॉललाच
आयटी हॅबिटॅट दोनापॉल येथेच येईल त्यासाठी आधीच जागा निश्चित झालेली आहे. भूतकाळात काय घडले या गोष्टी आता नकोत, असे मॉविन एका प्रश्नावर म्हणाले. पर्यावरणाभिमुख उद्योगांचे गोव्यात नेहमीच स्वागत केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे आता आयटी हॅबिटॅट पुनरुज्जीवीत होईल, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रसना ग्रुपचे सीएमडी पिरुझ खंबाटा यांनी आपला उद्योग समूह आता काजुधारित पदार्थ व पेये उत्पादित करणार असल्याचे जाहीर केले.