हुंडाबळी प्रकरण: 'त्या' सासुला अखेर अटकपुर्व जामीन मंजूर
By सूरज.नाईकपवार | Published: December 14, 2023 03:45 PM2023-12-14T15:45:22+5:302023-12-14T15:46:34+5:30
मडगाव : हुंडाबळीचा आरोप असलेल्या त्या सासुला थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. पेट्राेसिना फर्नाडीस हिच्या अटकपुर्व जामिन अर्जावर ...
मडगाव : हुंडाबळीचा आरोप असलेल्या त्या सासुला थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. पेट्राेसिना फर्नाडीस हिच्या अटकपुर्व जामिन अर्जावर येथील दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने निवाडा देताना तिला सर्शत जामिन मंजूर केला. ५० हजार रुपये व तितक्याचा रक्कमेचा एक स्थानिक हमिदार व अन्य अटीवर तिला हा जामिन देण्यात आला.
संशयिताच्यावतीने वकील अमेय प्रभुदेसाई यांनी युक्तीवाद केले. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष पुजा कवळेकर यांच्या न्यायालयाने निवाडा देताना संशयिताला हा अटकपुर्व जामीन दिला. संशयिताने आपला पासपोर्ट शरण करावा, न्यायालयाच्या परवानगी शिवाय राज्याबाहेर जाउ नये. तपास अधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा तपासकामासाठी हजर रहावे तसेच साक्षिदारावर दबाव आणू नये अशी अटी घालण्यात आली आहे.
प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या पेट्रोसिना फर्नांडिस यांच्या अर्जावर सरकार पक्षातर्फे यू. आवडे यांनी युक्तिवाद केला. सामंता फर्नांडिस या तीसवर्षीय विवाहितेचा ३० ऑगस्ट रोजी जळून मृत्यू झाला होता. सासरी हुंड्यासाठी सासूकडून छळ होत असून, त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा दावा मृत सामंथा यांच्या आईने केला होता. जोपर्यंत संशयितांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचाही निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर मायणा- कुडतरी पोलिसांनी पेट्रोसिना हिच्यावर भादंसंच्या ३०४ (ब) कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.
दरम्यान, सामंथा हिचा सासरी छळ केला जात नव्हता. पती तिला खर्चासाठी वेळोवेळी पैसे देत असे. सांमथा हिने मृत्यूच्या दिवशी तीन वेळा आपल्या आईला कॉल केला होता. तिचे पतीसोबतचे सोशल मीडियावरील चॅटिंगही यावेळी न्यायालयात सादर करण्यात आले होते.