अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा, केंद्राचे पुढील २५ वर्षांचे नियोजन: डॉ. भागवत कराड 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:57 PM2023-02-15T13:57:40+5:302023-02-15T13:58:28+5:30

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी 'लोकमत' कार्यालयास भेट देऊन दैनिकाबद्दल गौरवोद्गार काढले.

dr bhagwat karad said budget to lead country to prosperity centre next 25 year planning | अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा, केंद्राचे पुढील २५ वर्षांचे नियोजन: डॉ. भागवत कराड 

अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा, केंद्राचे पुढील २५ वर्षांचे नियोजन: डॉ. भागवत कराड 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अमृत काळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा आहे. युवा वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान उद्योजक तसेच पगारदार अशा सर्वच घटकांना लाभ मिळेल याची दक्षता या अर्थसंकल्पात घेतली आहे, असे प्रतिपादन गोवा भेटीवर आलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री डॉ. कराड म्हणाले की, 'पुढील २५ वर्षांचे ध्येय ठेवून वेगवेगळ्या ४५० योजना असलेला अर्थसंकल्प तयार करण्यात आला. २०४५ मध्ये भारत विश्वगुरू कसा बनेल, हे आमचे लक्ष्य आहे. भांडवली खर्चात या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी वाढ करून १० लाख कोटी रुपये केला आहे. ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची तरतूद मोठा दिलासा देणारी ठरली आहे.'

डॉ. कराड म्हणाले की, 'पंतप्रधान आवास योजनेतील तरतूद ६६ टक्क्यांनी वाढवून ७९,५९० कोटी रुपयांवर नेली. मोठ्या प्रमाणात घरे बांधली जातील, रोजगारही वाढेल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.

महागाई कमी करणार

महागाई कमी करण्यास सरकारने पावले उचलली आहेत. सध्या महागाई दर ५.६ टक्के आहे. तो ५ टक्क्यांपर्यंत खाली यायला हवा. येत्या १३ मार्च ते ६ एप्रिल या काळात संसदेचे अधिवेशन होईल. तीत अनुदान मागण्या मांडून मंजुरी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ७४० एकलव्य मॉडेल स्कूल्स येतील त्यातून ३८,२०० शिक्षकांची भरती होईल. ईशान्येतील राज्यांसाठी ५५०० कोटी रुपये तरतूद केली आहे. असे ते म्हणाले.

जीएसटीबाबत १८ रोजी चर्चा

लहान राज्यांना जीएसटी भरपाई बंद करू नये, अशी जी मागणी गोव्यासह अन्य लहान राज्यांकडून होत आहे त्यासंबंधी विचारले असता डॉ. कराड म्हणाले की, हा विषय जीएसटी मंडळाच्या अखत्यारीत येत असून येत्या १८ रोजी मंडळाची बैठक होईल तीत यावर चर्चा होणार आहे.

लोकमत कार्यालयास भेट व गौरवोद्गार

दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी 'लोकमत' कार्यालयास भेट देऊन दैनिकाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, गोव्यातही लोकमत प्रथम क्रमांकावर आहे, हे जाणून घेवून आनंद वाटला. मी लोकमत परिवार हा माझा परिवार समजतो. 'लोकमत'ची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. डॉ. कराड म्हणाले की, गोवा हे डिजिटल राज्य कसे करता येईल हे पाहावे. देशभरात आज डिजिटल प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. साधी भाजी खरेदी केली तरी क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट केले जाते. गोव्यात कर्ज घ्यायला लोक पुढे येत नाहीत. कदाचित येथील दरडोई उत्पन्न जास्त असल्याने असे घडत असावे. राज्यात अर्थव्यवस्था वाढावी, यासाठी काही उपाययोजना व्हायला हव्यात. वित्तीय साक्षरता, बँकिंगबाबत जागृती, डिजिटल जागृती या माध्यमातून अर्थव्यवस्था वाढेल. त्या अनुषंगाने गोव्यात परिषदाही आयोजित करता येतील, असे त्यांनी सुचविले. डॉ. कराड यांच्यासोबत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही लोकमत कार्यालयास भेट दिली. 'लोकमत'च्या गोवा आवृत्तीचे निवासी संपादक सद्गुरू पाटील, महाव्यवस्थापक संदीप गुप्ते यांनी स्वागत केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: dr bhagwat karad said budget to lead country to prosperity centre next 25 year planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.