लोकप्रतिनिधी म्हणून स्वत:ला एका वर्षात कष्टाने सिद्ध केले: डॉ. दिव्या राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 01:41 PM2023-03-07T13:41:00+5:302023-03-07T13:41:32+5:30
पुढील चार वर्षांत जनतेसाठी खूप काही करण्याचा संकल्प; महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत' कार्यालयाला भेट.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकप्रतिनिधी म्हणून आपण स्वत:ला एका वर्षात सिद्ध केले आहे. आपल्या मतदारसंघातील बहुतांश कामे पूर्ण केली आहेत. मतदारांसाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.
महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत' कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी साधलेल्या संवादावेळी त्या बोलत होत्या. रस्ता, पाणी, विजेशी संबंधित २५ टक्के कामे आपल्या प्रयत्नांतून पूर्ण केली आहेत. मात्र मतदारासंघासाठी आपल्याला खूप काही करायचे आहे. त्यासाठी आपल्याकडे अजूनही चार वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. पर्ये मतदारसंघातील पाण्याची समस्या सुटावी, यासाठी मार्ले कॉलनी येथे १५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प बांधला जात आहे.
इंटरनेट कनेक्टिव्हीटी लवकरच
पर्ये येथील शाळांचा दर्जा वाढवण्याप्रमाणे तेथील मुलभूत सुविधांचा विकास केला जात आहे. याशिवाय सध्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या भासत आहे. त्यामुळे अनेकदा मुलांनासुद्धा ऑनलाईन अभ्यास करताना अडचण येते. इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एका मोबाईल कंपनीशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
१५० जणांना खासगी नोकरी
सरकारी नोकरी मिळावी या अपेक्षेने अनेकजण आपल्याकडे येतात. मात्र सर्वांनाच सरकारी नोकरी देणे शक्य नाही. त्यामुळे जे कोण आपल्याकडे येतात, आपण त्यांना नेहमीच खासगी क्षेत्रात नोकरी करा, जेणे करून आर्थिक स्थिती सुधारेल असा सल्ला देते. मागील एका वर्षात १५० जणांना खासगी नोकरी दिली असे आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
इको टुरिझमच्या धर्तीवर पर्यटन विकास
वन महामंडळाच्या आपल्याकडे ताबा आहे. त्यामुळे महामंडळाकडून पर्ये येथील अनेक गावांचा इको टुरिझमच्या दृष्टीने विकास व्हावा, यासाठी भर दिला जात आहे. यात वेलनस सेंटर उभारण्याबरोबरव सुर्ल गावाचा हिल स्टेशनमुळे विकास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे त्या परिसरातील लोकांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल, असा विश्वास डॉ. राणे यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"