वेर्णा पठारावर ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी चालू होती ड्रॅग रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 07:24 PM2020-03-11T19:24:19+5:302020-03-11T19:24:49+5:30
हेलमेट शिवाय चालू बाईकचे स्टंट
मडगाव: ज्या रविवारी वेर्णाच्या त्या धोकादायक पठारावर रस्त्याच्या बाजूच्या खाईत कार पडून तीन अल्पवयीन मुलांचा बळी गेला त्याच रविवारी याच पठारावर ड्रॅग रेसिंगही चालू होते अशी धक्कादायक महिती पुढे आली आहे. हा अपघात झाल्याच्या काही मिनिटातच या रेसचे फोटो आणि व्हिडिओ इस्टाग्रामवर लोड झाले होते. सध्या समाज माध्यमावर तीच चर्चा चालू असून या जीवघेण्या रेसीवर पोलिसांनी नियंत्रण आणावे अशी मागणी लोक करू लागले आहेत.
इस्टाग्रामवर लोड झालेल्या विडिओत काही बायकर्स हेल्मेट घातल्याशिवाय स्टंट करत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकी वेगात एका चाकावर हाकण्याचे स्टंट चालू असताना हा विडिओ काढला गेला आहे. वेर्णाच्या या पठारावर दर शनिवार रविवारी अशा रेसचे आयोजन केले जाते.
दरम्यान अशा रेसी त्या रस्त्यावरून जाणार्या सामान्य माणसासाठीही धोकादायक असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे अशी मागणी सामान्य लोकाकडूनही होऊ लागली आहे. ज्या दिवशी हा कार अपघात झाला त्यावेळी ते तीन विद्यार्थी एवढ्या वेगात गाडी हाकत होते की त्यावेळी त्या रस्त्याने जाणारा एक स्कूटर चालक त्या वेगाच्या भीतीने रस्त्याच्या बाजूला आपले वाहन उभी करून राहिला. त्यावेळी त्याच्या स्कूटरच्या मागे एक गरोदर महिलाही बसली होती. अशी जीवघेणी गती आमच्या जिवावरही उठू शकली असती अशी प्रतिक्रिया त्याने पोलिसाकडे व्यक्त केली होती.
भविष्यात अशा प्रकारच्या रेसीवर नियंत्रण यावे यासाठी या पठारावर शनिवार रविवारी पोलिसांची गस्त वाढविणार तसेच रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स घालण्याचे उपाय घेण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले. त्याशिवाय वाहने रस्त्याच्या खाईत पडू नयेत यासाठी क्रॅश बेरीयर्स घालण्याची शिफारसही जिल्हा प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले.
गाडीच्या ताबेदारावर गुन्हा
मागच्या रविवारी जो अपघात झालं ते वाहन अल्पवयीन मुलाकडून चालविले जात असल्याने अशा मुलांच्या ताब्यात गाडी दिल्याच्या आरोपाखाली माना कुडतरी पोलिसांनी गाडीच्या ताबेदाराविरुद्ध गुन्हा नोंद केला. आयपीसीच्या कलम ३०४ अ (हलगर्जीपणामुळे मृत्यू) व मोटर वाहान कायद्याच्या १८० कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. सदर गाडी या अपघातात मृत पावलेल्या जोसूआ बार्रेटो (१४) याच्या आजोबाच्या मालकीची असून दोन वर्षापूर्वीच त्यांचेही मरण झाले आहे.
अन्यथा न्यायालयात
वाहन कायदे मोडणार्यावर कडक दंड व शिक्षेची तरतूद असलेला नवीन कायदा गोव्यात त्वरित सुरू करा अन्यथा सरकराच्या या अनास्थे विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा ग्रीन गोवा फाऊंडेशन या एनजीओने दिला आहे. कडक दंड नसल्यामुळेच वाहने निष्काळजीपणाने हाकली जातात त्यातूनच अपघात होऊ लागले आहेत. जर कडक कायदा असता तर अल्पवयीनांच्या हातात वाहन देण्यास पालक धजावलेच नसते असे या संघटनेचे अध्यक्ष रेजन आल्मेदा यांनी म्हटले आहे.