गोमंतकीय नाट्यलेखकाचा सीमापार झेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 06:06 PM2018-10-07T18:06:39+5:302018-10-07T18:07:15+5:30

‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ नाटक आता गुजरातेत चित्रपट रूपात 

drama writer rajeev shindes thodas logic thoda magic will be in gujarati language soon | गोमंतकीय नाट्यलेखकाचा सीमापार झेंडा 

गोमंतकीय नाट्यलेखकाचा सीमापार झेंडा 

Next

पणजी : नाटक हा कलाप्रकार तसा गोमंतकीयांच्या नसानसांत भिनलेला. कोणी स्वत: नाट्यकलाकार, कोणी नाट्यलेखक, दिग्दर्शक, तर कोणी नाट्यवेडा रसिक. असेच एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व अर्थात, प्रख्यात गोमंतकीय नाट्यलेखक, दिग्दर्शक राजीव शिंदे यांनी सिने/नाट्य कला क्षेत्रात आणखी एक मानाचा शिरपेच खोवत सीमापार झेंडा फडकावला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ नाटकाचा आता चित्रपट साकारतोय, तोही गुजराती भाषेत. सर्वच गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्पद बाब असून लवकरच हा चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

मराठी रंगभूमीवर लोटपोट हास्यकल्लोळ करून ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ नाटकाने कला क्षेत्रात एक नवी उंची गाठली आहे. मराठी नाटकात मोहन जोशी, माधवी गोगटे यासारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात ‘चार चांद’ चमकावले आहेत. विशेष म्हणजे राजीव शिंदे लिखित ‘थोडू लॉजिक, थोडू मॅजिक’ या गुजराती भाषेतील नाटकानेही गुजराती मुलखात तब्बल २०० हून अधिक प्रयोग करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या नाटकात टिकू तलसानिया आणि स्मिता जयकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कला क्षेत्रात या नाटकाला मिळालेली अफाट प्रसिद्धी लक्षात घेऊन याच नाटकाच्या संकल्पनेवर आधारित गुजराती सिनेमा साकारला जात आहे. हा चित्रपटही लोकप्रियतेच्या शिखरावर अढळ स्थान मिळवेल, अशी केवळ आशाच नव्हे, तर पूर्ण विश्वासही राजीव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आजोबा आणि नातू यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित या सिनेमाचे कास्टिंग सध्या सुरू असून कथा, पटकथा दोन्ही शिंदे यांनी लिहिल्या आहेत. या सिनेमासाठी शिंदे यांनी गुजराती भाषाही आत्मसात केली असून गुजराती भाषांतरासाठी त्यांना स्नेहा देसाई या लेखिका साहाय्य करत आहेत. या चित्रपटाच्या विषयाला साजेशी स्टार कास्टिंग सुरू असून प्रमुख कलाकार कोण आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण लवकरच याविषयीची उत्कंठा संपुष्टात येणार आहे. मराठी रसिक प्रेक्षकांनी हे अक्षरश: नाटक डोक्यावर घेतले. गुजरातेतही या नाटकाने अफाट प्रसिद्धी मिळवली. आता हा सिनेमाही निश्चितच लौकिकास पावेल, असा विश्वास शिंदे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. 

- राजीव शिंदे यांच्याविषयी थोडंसं... 
राजीव शिंदे हे प्रसिद्धीपरागमुख व्यक्तिमत्त्व. शिंदे यांनी साधारण ३० वर्षांपूर्वी महाविद्यालयीन काळात विविध एकांकिका सादर केल्या. त्याकाळी नाट्यकलाकार मिळणे दुरापास्त होते. शिंदे यांनीही नाटकात रस दाखविला. त्यावेळी प्रख्यात नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांचे कला प्रदर्शन गोव्यात ठिकठिकाणी भरत असे. तेथे शिंदे यांची तळाशीलकर यांच्याशी ओळख झाली. मग नाट्य कला आत्मसात करण्यासाठी ते नाट्यनगरी मुंबईला गेले. तळाशीलकर यांच्याकडे नेपथ्यकला शिकून दोन वर्षे त्यांनी काही चित्रपटांचे सेटही उभारले. ‘लूटमार’, ‘मनपसंत’ या चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांनी सेट उभारले. नंतर त्यांना गोव्यात कला महाविद्यालयात नोकरीसाठी आॅफर आली. पुन्हा त्यांनी नोकरीच्या निमित्ताने गोव्याला प्राधान्य दिले. पण त्यांच्यातील नाट्यकलाकार त्यांना गप्प बसू देत नव्हता. त्यांनी अनेक नाटक, चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन केले. ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे लेखन, नेपथ्य, दिग्दर्शन आणि प्रकाशयोजनाही त्यांनीच केली. 

कला क्षेत्रातील अनेक पुरस्कार शिंदे यांच्या नावावर आहेत. त्यातील काही प्रमुख पुरस्कार.

- १९९७ साली ‘देखणी दुराई’ या कोंकणी चित्रपटाला गोवा राज्य सरकारचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला. 

- २०१६ सालच्या ४७ व्या इफ्फीमध्ये त्यांनी कथा, पटकथा संवाद लिहून दिग्दर्शन केलेल्या ‘के सेरा सेरा’ चित्रपटाचा इंडियन पॅनोरमा विभागात समावेश होता. या चित्रपटासाठी त्यांना माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला.

- ‘यु अ‍ॅण्ड मी’, ‘स्मोकिंग इज सुसाईड’, ‘पीस आॅफ मार्इंड गॅरेंटेड’ या त्यांच्या शॉर्ट फिल्मना विविध पुरस्कार प्राप्त झाले. 

- २०१४ साली ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ या नाटकाला महाराष्टÑ राज्य सरकार आणि मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला. 

- २०१६ साली त्यांना गोवा राज्य सरकारचा ‘रंग सन्मान’ पुरस्कारही मिळाला आहे.

Web Title: drama writer rajeev shindes thodas logic thoda magic will be in gujarati language soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा