सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न - आयुषी साहू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:45 AM2019-05-07T00:45:08+5:302019-05-07T00:46:05+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात केंद्रीय विद्यालय, बांबोळीच्या आयुषी साहू हिने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
प्रवीण साठे
पणजी - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात केंद्रीय विद्यालय, बांबोळीच्या आयुषी साहू हिने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. आयुषी हिने ९८.६ टक्क्यांनी बाजी मारली. आपल्या मेहनतीचे चीज झाले, वैद्यकीय शाखेतून शिक्षण घेत भविष्यात सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे, असे आयुषीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ती म्हणाली की...
दहावीच्या परीक्षेत जास्त टक्के मिळवण्याचा कुठलाही दबाव नव्हता. परिवाराकडूनही तशी अपेक्षा नव्हती. परंतु सातत्यपूर्ण मेहनत केली आणि त्याचे चीज झाले. या निकालाने मलाही आश्चर्य वाटते. राज्यात प्रथम आल्याचे कळताच आनंद गगनात मावेनासा झाला.
पूर्ण वर्षात दिवसातून केवळ एक ते दोन तास अभ्यास करायचे. फक्त परीक्षेच्यावेळी पूर्ण दिवस अभ्यास केला. फावल्या वेळेत संगीत ऐकायचे. त्यामुळे मन प्रसन्न राहण्यासाठी मदत झाली. शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी खूप मदत केली. वेळोवळी उद्भवणाºया प्रश्नांचे तत्काळ निरसन त्यांच्याकडून व्हायचे.
आई-वडिलांचा अभ्यासासाठी कोणताच दबाव नव्हता. एवढेच टक्के मिळाले पाहिजेत, यासाठी जबरदस्ती केली नाही. तुला जे साध्य करायचे आहे ते तू कर, असे ते नेहमी सांगायचे. टीव्ही पाहू नको किंवा मोबाइल वापरू नको, असे सुद्धा कधी त्यांनी सांगितले नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला पूर्ण सहकार्य केले.
‘बुद्धि’बळाचा फायदा
गणित आणि विज्ञान हे माझे सर्वांत आवडते विषय. तर बुद्धिबळ हा खेळ खूप आवडतो. रिकाम्या वेळेत मी बुद्धिबळ खेळते. बुद्धिबळाने माझ्या एकाग्रतेत वाढ होते. बुद्धीला चालना मिळते. परीक्षेसाठी मला या खेळाचा खूप फायदा झाला. शरीर आणि मनाच्या व्यायामासाठी एखादातरी खेळ खेळायला हवा, असा सल्ला तिने दिला.
केंद्रीय विद्यालय बांबोळीचा शंभर टक्के निकाल
केंद्रीय विद्यालय बांबोळीतून ५३ विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाची दहावीची परीक्षा दिली. शाळेचे सर्व विद्यार्थी चांगल्या टक्केवारीसह उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य आर. ए. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.