ड्रग्सविरोधात मुरगावात पोलिसांनी कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:27 PM2018-10-08T15:27:02+5:302018-10-08T15:27:40+5:30

गोव्याच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून या काळात गोव्यात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

drive against drugs from Murgaon police | ड्रग्सविरोधात मुरगावात पोलिसांनी कंबर कसली

ड्रग्सविरोधात मुरगावात पोलिसांनी कंबर कसली

Next

- पंकज शेट्ये 


वास्को : गोव्याच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून या काळात गोव्यात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा, मुरगाव अशा विविध पोलीस स्थानकातील पोलिसांनी या अमली पदार्थांविरोधात कंबर कसली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली.


गोव्यातील पर्यटन हंगामाला ४ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आणि दोन दिवसांतच गोव्यातील विविध भागातून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करून आरोपींना गजाआड करण्यात आल्याच्या बातम्या झळकू लागल्या. विविध भागातून सुमारे १५ लाख रुपयांचा अमली पदार्थ पोलिसांनी पकडला असून पर्यटन हंगामात या वाढणाऱ्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी गोवा पोलिस विविध प्रकारची पाऊले उचलत आहेत.


मुरगाव तालुक्यातील वास्को रेल्वे स्थानकात उत्तर भारत तसेच इतर विविध राज्यातून येणारे काही प्रवाशी गांजा, चरस सारखे अमली पदार्थ गोव्यात विकण्यासाठी घेऊन येत असल्याची चर्चा अनेक काळापासून होत आहे. पर्यटन हंगामाच्या काळात या प्रकारात वाढ होण्याची जास्त शक्यता असल्याने पोलिसांकडून वास्को रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे.
तसेच वास्को शहरात व जवळपासच्या भागात भारतातील विविध राज्यातून माल घेऊन ट्रक, ट्रेलर, कँटर अशी अवजड वाहने येत असतात. माल वाहतूक करण्याबरोबरच काही वाहनचालक किंवा त्यांचे क्लिनर अमली पदार्थ गोव्यात विकण्यासाठी घेउन येतात. या ट्रक्सची तपासणी करणे गरजेचे आहे.


वास्को शहरातील विविध भागात (मंगोरहील, शांतीनगर, बायणा, खारीवाडा) पूर्वी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीसांनी यापूर्वी याच्याविरुद्ध कारवाई करत अनेकांना गांजा, चरस सारख्या अमली पदार्थांसहीत रंगेहाथ पकडून गजाआड केलेले आहे. मुरगाव तालुक्यात पर्यटक हंगामाच्या काळात अजून एकही अमली पदार्थाच्या प्रकरणाची कारवाई झालेली नसल्याने मुरगाव तालुक्यातील या भागातून (मंगोरहील, शांतीनगर, बायणा, खारीवाडा इत्यादी) अमली पदार्थांचा व्यवहार वाढण्याची शक्यता आहे.


मुरगाव तालुक्यात अमली पदार्थांच्या विरुद्ध येणाऱ्या काळात कशा प्रकारे पोलीस कारवाई करणार याबाबत माहीती घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांच्याशी संपर्क केला असता येथील वास्को, वेर्णा, मुरगाव पोलीस सतत अमली पदार्थांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. पर्यटक हंगामा सुरू झाल्याने बेकायदेशीररीत्या अमली पदार्थांचा व्यवहार करण्याच्या प्रकारात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे उपअधीक्षक सावंत यांनी मान्य करून त्यादृष्टीने पोलिसांनी विविध प्रकारे कडकरीत्या नजर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.


अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही खबरी पूर्णपणे ‘अ‍ॅक्टीव्ह’ केलेले असल्याचे सावंत यांनी सांगून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या माहिती सतत घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच रेल्वे प्रवासी, परराज्यातून येणारे ट्रक व इतर अवजड वाहने यांची तपासणी करण्यास सुरवात करण्यात आलेली असल्याची माहिती सावंत यांनी पुढे दिली. गोवा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी गोवा पोलीस सतत कार्य करत असून मुरगाव तालुक्यातूनही अमली पदार्थाच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी येथील पोलीस अधिकारी विविध पावले उचलत असल्याचे सावंत यांनी शेवटी सांगितले.

सुमारे ४ किलोचे ड्रग्स जप्त
मागच्या दहा महिन्यात (जानेवारी ते ऑक्टोबर) मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा व मुरगाव अशा पोलीस स्थानकावरील अधिकाऱ्यांनी कारवाई करून १६ वेगवेगळ्या प्रकरणात अमली पदार्थ पकडण्याची कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १७ जणांना गजाआड करण्यात आलेले असून गांजा व चरस मिळून एकूण ३.९६१ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. या वर्षी येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईत मंगोरहील भागात एका व्यक्तीने चक्क गांजाची रोपटी लावल्याचे उघड झाले असून या प्रकरणात त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करून ४२८ ग्रॅम वजनाचा गांजाही पोलिसांनी जप्त केला होता.
 

Web Title: drive against drugs from Murgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.