झुआरीनगर अपघातात कारचालक जागीच ठार
By admin | Published: March 6, 2015 01:17 AM2015-03-06T01:17:02+5:302015-03-06T01:19:10+5:30
वास्को : झुआरीनगर येथे चौपदरी महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चारचाकीचालक जागीच ठार झाला, तर त्या वाहनातील युवती व इतर चार युवक गंभीर जखमी झाले.
वास्को : झुआरीनगर येथे चौपदरी महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चारचाकीचालक जागीच ठार झाला, तर त्या वाहनातील युवती व इतर चार युवक गंभीर जखमी झाले. जखमींपैकी तिघाजणांना बांबोळीच्या गोमेकॉत दाखल केले आहे. दोन युवकांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर दोघा जखमींना वास्कोतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी युवकांकडून जबाब घेणे शक्य न झाल्याने हा अपघात घडण्याचे कारण वेर्णा पोलिसांना समजू शकले नाही.
गुरुवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने झुआरीनगर येथे बिट्स पिलानी आणि झुआरी इंडियन आॅईल टँकिंग कंपनी यांच्या मध्ये असलेल्या स्थळावर अपघात घडल्याचे कळविले. वेर्णा पोलिसांना घटनास्थळी झेन एस्टिलो (क्र. जीए ०३/एच १६५४) या गाडीचा चक्काचूर झालेला आढळला. तसेच त्या मोटारीत एका युवतीसह सहा युवक जखमी अवस्थेत सापडले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, पाच युवक वास्कोतील, तर मोटारीत असलेली युवती ही कळंगुट येथील असल्याचे सांगण्यात आले.
वाहनचालक अॅलिस्टन सुकूर डिमेलो (२२, रा. पिशे डोंगरी-वास्को) असून तो जागीच ठार झाला होता. या अपघातात अॅन्थोनी रिबेलो (रा. पिशे डोंगरी), रोहन गौड (रा. मेस्तवाडा), जोसेफ डिसोझा (रा. पिशे डोंगरी) व पॅट्रिक डिसोझा (पिशे डोंगरी), उमा आलय (३०, रा. कळंगुट)
जखमी झाले.
अॅन्थोनी रिबेलो, रोहन गौड आणि उमा आलय यांना बांबोळीच्या गोमेकॉत दाखल केले असून अॅन्थोनी आणि रोहन यांची प्रकृती चिंताजनक आहे. जोसेफ
डिसोझा आणि पॅट्रिक डिसोझा यांना वास्कोतील एसएमआरसी हॉस्पिटलात दाखल केले आहे.
वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला. वेर्णा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डी. के. भट, निरीक्षक शैलेश नार्वेकर तपास करत आहेत. (प्रतिनिधी)