ड्रॉपआउट विदयार्थ्याची गोव्यात आत्महत्या: सारा परिसर गेला हादरुन
By सूरज.नाईकपवार | Published: February 10, 2024 06:59 PM2024-02-10T18:59:01+5:302024-02-10T18:59:15+5:30
कायदेशीर सोपस्कारानंतर मृतदेह मयताच्या कुंटुबियांच्या स्वाधीन करण्यात आला.
मडगाव: ड्रॉपआउट झालेल्या एका सतरा वर्षीय विदयार्थ्याने घरातील मंडळी झोपी गेलेले असताना गळफास लावून आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शुक्रवारी घडली. हा मुलगा आपल्या कुटुंबियांसमवेत रहात होता. परवा शुक्रवारी दुपारी वरील घटना घडली. या घटनेमुळे सारा परिसर हादरुन गेला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर मायणा कुडतरी पोलिसांनी संबधीत ठिकाणी जाउन पंचनामा केला. येथील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इस्पितळात त्या मुलाला नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहे. कायदेशीर सोपस्कारनंतर मृतदेह मयताच्या कुंटुबियांच्या स्वाधीन करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंबिय गरीब घरातील आहेत. ते मूळ कर्नाटकातील बागलकोट येथील आहे. त्याचे वडील फळविक्री करतात, मयताने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. नंतर त्याला ओपन स्कुलमध्ये घातले होते. २५ हजार रुपये खर्चही केले होते. मात्र तो वर्गात अनुपस्थित रहात होता. शुक्रवारी त्याचे वडील नैसर्गिक विधीसाठी उठून खोलीच्या बाहेर जात असतान त्याला आपला मुलगा झोपलेल्या ठिकाणी आढळला नाही. त्यांनी शोधाशोध केली असता, छताला गळफास लावलेल्या स्थितीत तो आढळला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे.