थोबाडीतही पडली व निलंबनही; आयपीएसला रंगेलपणा भोवला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:03 AM2023-08-17T10:03:54+5:302023-08-17T10:08:38+5:30
निलंबनामुळे आता त्याच्या वेतनावर आणि इतर भत्यांवरही निर्बंध येणार असून निलंबनाचा आदेश हा तात्काळ लागू होत असल्याचेही म्हटले आहे.
वासुदेव पागी
पणजी : गोव्याचे आयपीएस अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक ए कोन यांना ऐय्याशी व रंगेलपणा चांगलाच भोवला. आधी युवतीकडून मार खावा लागला तर आता सेवेतूनगी निलंबित करण्यात आले आहे. डीआयजी कोन याला कळंगुट येथील नाईट क्लबमधील युवतीशी केलेल्या गैरवर्तनासाठी सेवेतून निलंबित करण्याचा आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आला आहे.
निलंबनामुळे आता त्याच्या वेतनावर आणि इतर भत्यांवरही निर्बंध येणार असून निलंबनाचा आदेश हा तात्काळ लागू होत असल्याचेही म्हटले आहे. कोन याने कळंगुटमधील एका नाईट क्लबमध्ये एका युवतीला गैरपद्धतीने स्पर्श केला होता. त्यामुळे त्या युवतीने त्यांच्या थोबाडीत मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. 'लोकमत'मधून हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोवा विधानसभेतही हे प्रकरण गाजले होते. त्यांच्याविरुद्ध उशिरा आदेश जारी करून त्याला कारवाई करण्यात येणार असल्याचे सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच त्याची अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली होती. या चौकशीत तो दोषी आढळल्यामुळे त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या यापूर्वीच काढून घेण्यात आल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयाला त्याच्या या कारनाम्याची माहिती देणारे पत्र गोवा पोलीस महासंचालकांनी पाठविले होते. त्यामुळे कोन याच्या निलंबनाचा आदेश अपेक्षितही होता.
निलंबन काळात त्याला पणजी मुख्यालयात हजर रहावे लागणार आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गोवा सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.