८० लाखांचा ड्रग्ज साठा जप्त; राज्यात ड्रग्जविरोधी पथकांकडून मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:59 PM2023-05-04T12:59:42+5:302023-05-04T13:02:14+5:30
चार दिवसांतील कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात ड्रग्जविरोधी मोहीम जोरात सुरू आहे. दि. २९ एप्रिल ते २ मे या चार दिवसांत तब्बल तीन मोठ्या कारवाईत ८० लाख रुपयांचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.
अमली पदार्थांचे व्यवहार रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभाग आणि राष्ट्रीय नार्कोटिक नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) ही मोहीम सुरू केली आहे. कोण किती व कशी कारवाई करतो, या बाबतीत एकमेकांशी स्पर्धाच चालली आहे.
चार दिवसांत दोन्ही एजन्सीकडून आणि गोवा पोलिसांच्या इतर विभागांकडून मिळून सुमारे ८० लाख रुपये किमतीचा अमलीपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. चार छाप्यात ७ जणांना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम अशीच चालू राहणार असल्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी छापामारी होणार आहे. दि. २९ एप्रिल रोजी एसीबीकडून मांद्रे येथे टाकलेल्या छाप्यानंतर ड्रग्जविरोधी मोहिमेने वेग घेतला. हा छापा फार मोठा होता.
या छाप्यात विविध प्रकारचे घातक विदेशी अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. ३० लाख रुपये किमतीचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. यात रशियाच्या ऑलिंपिकपदक विजेत्या महिला खेळाडूलाही अटक करण्यात आल्यामुळे हा छापा राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय झाला.
ड्रग्स फॅक्टरीमुळे नाचक्की
पर्यटकांनी गजबजलेल्या हणजूण किनारी भागात ड्रग्सची फॅक्टरी चालविली जाते आणि स्थानिक पोलिसांना याचा थांगपत्ताही लागत नाही. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) कारवाई करून ती उद्ध्वस्त करावी लागते, यावरून हणजूण पोलिसांची पूर्ण नाचक्की झाली आहे.
एखाद्या ठिकाणी गांजा उत्पादन करण्याचे कारनामे झाले तर त्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत. कारण काहीही पेरले तर ते उगवतेच आणि गांजा आणि इतर वनस्पती हे समजण्यासाठी वेळ जावा लागतो. त्यामुळे अशा गोष्टी अनेक ठिकाणी घडल्याही आहेत; परंतु कच्चा माल आणून एलएसडीसारख्या विदेशी आणि अत्यंत घातक अमली पदार्थ बनविण्याची फॅक्टरीच सुखेनैव सुरू आहे आणि स्थानिक हणजूण पोलिसांना याचा पत्ताच नाही ही धक्कादायक गोष्ट आहे. एनसीबीकडून हणजूण येथे गुप्त कार्यरत असलेल्या एलएसडी ड्रग्सच्या उत्पादन केंद्राचा पर्दाफाश केला आहे.
विस्तृत धागेदोरे
गोव्याबाहेरून कच्चा माल आणून या ठिकाणी एलएसडी हा घातक अमली पदार्थ बनविला जात होता. या छाप्यात कच्चा माल आणणे म्हणजे त्यासाठी नियमित पुरवठादार असणार, शिवाय कच्च्या मालापासून एलएसडी बनविणारीही माणसे असणार. इतकेच नव्हे तर पोलिसांना या छाप्यावेळी कच्च्या मालासह अमेरिकन डॉलर्स आणि श्रीलंकन चलनी नोटाही जप्त केल्या आहेत. याचे धागेदोरे विदेशातही पोहोचल्याचा एनसीबीला संशय आहे.
साथीदार मोकाट
या छाप्यात एकाला अटक करण्यात आली असली तरी एलएसडी निर्मिती हे एकाचे काम असूच शकत नाही. प्रत्यक्ष कच्च्या मालापासून एलएसडी बनविणारे आणि ते विकणारे कोण आहेत. याची माहिती घेण्याचे एनसीबीकडून प्रयत्न सुरु आहेत. कारवाईत २५.१७ लाख रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"