गोव्यात ड्रग्ज पार्ट्यांचा धुमाकूळ; विनोद पालयेकरांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 06:53 PM2019-11-22T18:53:28+5:302019-11-22T18:54:18+5:30
माङया शिवोली मतदारसंघासह उत्तर गोव्याच्या विविध किनारी भागांमध्ये ड्रग्जच्या व्यवसायाचा प्रचंड हैदोस सुरू आहे.
पणजी : राज्याच्या किनारपट्टी भागात ड्रग्जच्या समावेशाने पार्ट्यांचा धुमाकूळ सुरू आहे पण आपण लेखी माहिती देऊन देखील गृह खाते काहीच कारवाई करत नाही अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विनोद पालयेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालयेकर म्हणाले की, माङया शिवोली मतदारसंघासह उत्तर गोव्याच्या विविध किनारी भागांमध्ये ड्रग्जच्या व्यवसायाचा प्रचंड हैदोस सुरू आहे. रात्री दहार्पयत पार्ट्या करण्यास उपजिल्हाधिकारी परवानगी देतात पण त्याचा गैरफायदा घेऊन पहाटेपर्यत आयोजक रेव्ह पार्टी सुरू ठेवतात. त्यात ड्रग्जचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. मी मुख्यमंत्र्यांना यापूर्वी माहिती दिली होती. मी आयजीपींनाही माहिती दिली. कोणकोणत्या भागांमध्ये ड्रग्जच्या पाटर्य़ा चालतात ते मी सांगितले पण गृह खाते निष्क्रीय आहे.
ड्रग्जचा धंदा केवळ किनारी भागातच मर्यादित राहिला नाही तर तो खेड्यापाड्यात पोहचला आहे. नवी पिढींना हा चुकीचा संदेश जात आहे. मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शुक्रवारी स्मरण पत्र पाठवले व पुन्हा पोलीस महानिरीक्षकांशी देखील याबाबत बोललो आहे. ते कारवाई करू एवढेच म्हणतात. आमच्या भागात तर एक पोलिस निरीक्षक व काही उपनिरीक्षक ड्रग्ज व्यवसायिकांच्या गाड्यांमधून फिरतात हे लोक देखील पाहत आहेत. यावरून सरकारच्या व पोलिसांच्याच मदतीने ड्रग्ज व्यवसाय चाललाय की काय असा प्रश्न पडत असल्याचे पालयेकर यांनी सांगितले.
दरम्यान, जर मुख्यमंत्री सावंत यांना गृह खाते सांभाळता येत नसेल तर त्यांनी ते खाते मंत्री मायकल लोबो यांच्याकडे सोपवावे. लोबो हे काम करून दाखविणारे मंत्री आहेत.शिवाय ते किनारी भागातीलच असल्याने ते ड्रग्ज धंद्याविरुद्ध कारवाई करू शकतील, असे पालयेकर म्हणाले.