मंदीचे सावट असतानाही पहिल्या साडेसात महिन्यात गोव्यात 4.62 कोटींचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:48 PM2020-08-18T15:48:22+5:302020-08-18T15:48:54+5:30
नशामुक्त गोवा केवळ एक कल्पना : 21 गोमांतकीयासह एकूण 70 जणांना अटक
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: कोरोनामुळे संपूर्ण राज्यात मंदीचे सावट असल्याचे सांगण्यात येत असले तरी अमली पदार्थांच्या व्यसवसायात या 'उडत्या गोव्यात' अजूनही नेहमीप्रमाणेच तेजी असून यंदा पहिल्या साडेसात महिन्यातच गोव्यात तब्बल 4.62 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आल्याचे उपलब्ध माहितीवरून पुढे आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नशामुक्त भारत हे जरी स्वप्न असले तरी नशामुक्त गोवा ही केवळ कल्पनाच असल्याचे सिद्ध करणारी ही आकडेवारी असून संपूर्ण राज्य स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना वागातोर येथील कपील झवेरी या सिने अभिनेत्याच्या विल्हात चालू असलेल्या रेव्ह पार्टीने त्यावर जणू शिक्कामोर्तब केले आहे. या पार्टीवर छापा टाकला गेला त्यावेळी 9 लाखांचे सिंथेटिक ड्रग्स आढळून आले आहेत. यावेळी तीन विदेशी महिलांसह एकूण 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
'लोकमत''कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारी प्रमाणे यंदा 15 ऑगस्ट पर्यंत या व्यवसायात सामील असलेल्या तब्बल 70 जणांना अटक करण्यात आली असून त्यात 23 विदेशी, 36 देशी तर 21 गोवेकरांचा समावेश आहे.
उत्तर गोव्यातील पेडणे आणि बारदेस पर्यंतचा समुद्री पट्टा हा व्यवसायाचे मुख्य केंद्र असून यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातच या भागातून 2.42 कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले होते. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात हा व्यवसाय काही प्रमाणात मंदावला होता पण आता तो पुन्हा तेजीत येऊ लागला आहे.
जानेवारी महिन्यात अशी पाच मोठी प्रकरणे उजेडात आली होती त्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरगाव येथे एका नायजेरियनला अटक केली असता त्याच्याकडे 50 लाखांचा माल सापडला होता. सहा दिवसानंतर म्हणजे 6 जानेवारी रोजी वागातोर येथे धाड घातली असता म्हापसा येथील प्रितेश जाधव याच्याकडे 3 लाखांचा माल मिळाला होता.
7 जानेवारी रोजी शिवोली येथे एका जर्मन नागरिकाला अटक केली असता त्याच्याकडे 75 लाखांचे एलएसडी पेपर्स सापडले होते. याच महिन्यात शिवोली आणि अंजुना येथे दोन नायजेरियनाना अटक केली असता त्यांच्याकडे प्रत्येकी प्रत्येकी सहा लाखांचा माल सापडला होता.
फेब्रुवारी महिन्यात हरमल येथे एका टर्कीश निवृत्त कमांडोला अटक केली असता त्याच्याकडे 71 लाखांचा माल मिळाला तर त्याच महिन्यात मांद्रे येथे हिमाचल प्रदेशच्या दोघांना अटक केली असता त्यांच्याकडे 95 लाखांचा चरस सापडला होता.
मार्च महिन्यात शिवोली येथेच एका रशियन व्यक्ती राहत असलेल्या बंगल्यावर धाड घातली असता तो चक्क येथे गांजाची लागवड करत असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्याच्याकडून 1.60 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.