दारुडे चालक नव्हे खुनी; बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 07:09 AM2024-05-30T07:09:44+5:302024-05-30T07:11:20+5:30
गोव्यात वाहन अपघातांची संख्या कमी व्हावी म्हणून सरकार फार काही करत नाही, केवळ वरवरचे उपाय योजले जातात.
गोव्यात असो किंवा महाराष्ट्रातील पुण्यात असो, दारुडे चालक खुनीच ठरू लागले आहेत. गोव्यात गेल्या वर्षभरात किंवा सहा महिन्यांत जे अपघात झाले, त्यापैकी काही वाहनांचे चालक मद्याच्या नशेत होते है कळून आलेच. परवा तर एका दारुड्या बसचालकाने चौघा निष्पाप मजुरांचा जीव घेतला. वेर्णा येथे रस्त्याकडेच्या झोपडीत झोपलेल्या मजुरांना त्याने चिरडले. यापूर्वी बाणस्तारी येथे झालेल्या वाहन अपघातात गोव्यातील धनाढ्य कुटुंबातील तरुणाने तिघांचे बळी घेतले होते. तोही दारूच्या नशेत होता. गोव्यात वाहन अपघातांची संख्या कमी व्हावी म्हणून सरकार फार काही करत नाही, केवळ वरवरचे उपाय योजले जातात.
सरकार केवळ कोट्यवधी रुपये खर्च करून फेस्टिव्हल आणि सोहळे करण्यात धन्यता मानते. लोकांचे जीव सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचे राहिलेलेच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल. सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते व पोलिसांचा वाहतूक विभाग यांच्या सातत्याने बैठका होत नाहीत. वास्तविक या तिन्ही खात्यांच्या किंवा विभागांच्या नियमित बैठका व्हाव्यात, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी होती. मात्र मुख्यमंत्री निवडणूक प्रचार कामात बिझी राहिले. वाहतूकमंत्री माविन गुदिन्होही त्याच कामात व्यग्र होते. आता प्रचार नाही, पण पक्षकार्य संपलेले नाही. वाहतूक पोलिसांचा वापर हा केवळ गोव्याबाहेरील वाहने अडवून त्यांना तालांव देण्यासाठीच केला जात आहे.
बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग येते, मग धूळखात पडलेले अल्कोमीटर बाहेर काढले जातात. आता नव्याने मोहीम जरा सुरू झालेली आहे. गेल्या चार दिवसांत यंत्रणेने ७० मद्यपी चालकांना पकडले. काही ट्रक चालक, बसचालक किंवा कारचालक रात्रीच्यावेळी हमखास नशेत आढळतात. काहीजण दुपारीच ढोसून गाडी चालवतात, बसचालक दारुडा निघाला तर बसमधील सर्व प्रवाशांच्या जीवाशी तो खेळ ठरतो. २२ ते २५ मे या चार दिवसांत एकूण ४ हजार ८८५ वाहतूक नियमभंगाच्या केसेस नोंद झाल्या. सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत ७० दारुडे चालक आढळून आले, त्यांना दंड ठोठावण्यात आला.
वास्तविक अशी मोहीम सुरूच राहायला हवी. काल सायंकाळीच एक बातमी येऊन थडकली की फाझील फराश नावाच्या चालकाला म्हापसा न्यायालयाने दोन दिवस कारावास व साडेदहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीला कळंगुट पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात पकडले होते. अशाच प्रकारे दारुड्या चालकांना शिक्षा व्हायला हवी, असे गोमंतकीय म्हणतील. यापेक्षाही कडक शिक्षा झाली तर आणखीच चांगले ठरेल. स्वतः मद्य ढोसून गाडी चालवताना तो चालक स्वतःचा जीव धोक्यात घालतोच, पण दुसऱ्याचादेखील जीव घेत असतो. रस्त्याने जाणारे पादचारी, दुचाकीस्वार यांनाही असे चालक आपले वाहन ठोकतात. यापूर्वीही दारुड्या चालकांमुळे गोव्यात खूप अपघात झालेले आहेत. सरकारी यंत्रणेने कारवाई मोहीम सुरूच ठेवायला हवी. केवळ वाहतूक परवाना निलंबित करणे हा उपाय नव्हे, अपघातास कारण ठरणारे दारुडे चालक तुरुंगातच पोहोचायला हवेत. शिवाय ज्या मद्यपी चालकांमुळे दुसऱ्याचा जीव जातो, अशा चालकांवर खुनाचा गुन्हा नोंद व्हायला हवा. तो केवळ अपघात आहे असे मानले जाऊ नये.
गोव्यात अजूनदेखील अनेक दुचाकी चालक हेल्मेट न घालता वाहन चालवतात, हेही चिंताजनक आहे. गोव्यात गेल्या तीन महिन्यांत अनेक दुचाकीस्वारांचे बळी गेले आहेत. अर्थात, यात हेल्मेट घातलेले दुचाकी चालकही आहेत. वाईट वाटते की अवघ्या वीस-पंचवीस किंवा तीस-चाळीस वयोगटातील बाइक चालक रस्त्यावर मरण पावत आहेत. वाहनांची गर्दी असली तरी, भरधाव वेगाने अनेक दुचाकी चालक आपले वाहन पुढे नेतात. काही युवक तर प्रचंड वेगाने महामार्गावरून दुचाकी हाकतात. आई-वडिलांनी आपल्या लाडक्या कोवळ्या मुलांना दुचाकी घेऊन दिलेली असते. अलीकडे अतिवेगाच्या बाइक आलेल्या आहेत. २०१९ साली ६६ दुचाकीस्वार अपघातात मरण पावले. २०२० मध्ये ५२ तर २०२१ साली ४३ दुचाकी चालक ठार झाले. २०२२ मध्ये ६८ दुचाकीस्वार दगावले. केवळ चार वर्षात तीनशेहून अधिक दुचाकीस्वार ठार झाले. हे चित्र भयावह आहे.