प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा ‘कदंब'चा मद्यधुंद चालक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 05:12 PM2023-11-10T17:12:21+5:302023-11-10T17:13:09+5:30
पणजीहून वाळपईकडे निघालेल्या बसमध्ये सायंकाळी उशिरा घडला प्रकार.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वाळपईकडे निघालेल्या कदंब महामंडळाच्या बसच्या मद्यधुंद चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा संतापजनक प्रकार काल सायंकाळी घडला. या घटनेनंतर रात्री उशिरा चालकाला निलंबित करण्यात आल्याचे कदंबचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले.
एल्विस रॉड्रिग्ज असे निलंबित चालकाचे नाव आहे. जुने गोवे परिसरात ही घटना घडली. जीए ०३ एक्स ०५१५ या क्रमांकाची बस पणजीहून वाळपईकडे निघाली होती. पणजीपासून पुढे गेल्यानंतर वाटेत मद्यधुंद चालकाने एका दुचाकीलाही धडक दिली. प्रवाशांनी आरडाओरडा करून चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले व नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या बसमध्ये सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी परतणारे कर्मचारी मोठ्या संख्येने होते. त्यामुळे बस खचाखच भरली होती. मद्यधुंद चालकाचा बसवरील ताबा सुटत असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांनी कंडक्टरला सांगून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो सर्वांना सुखरूप वाळपईला पोचवतो, असे पुन्हा पुन्हा सांगत होता. परंतु प्रवाशांनी एकाच गलका केला व बस थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर जुने गोवे पोलिसांना फोन करून पाचारण करण्यात आले व काही मिनिटातच पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात नेले.
तातडीने दुसरा चालक बोलावला...
बस थांबवल्यावर घाबरलेले प्रवाशी खाली उतरले व काहीजण दुसऱ्या बसने गेले तर पाठोपाठ पणजी डेपोतून दुसरा चालक पाठवून ही बस वाळपईला रवाना करण्यात आली. दरम्यान, योगायोगाने तिथे पोचलेल्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीने वाहकाला बोलते करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहकाने या घटनेवर भाष्य करण्याचे टाळले.