मद्यपी पर्यटकाने कारखाली चिरडून रिसॉर्ट मालकिणीचा घेतला बळी
By किशोर कुबल | Published: November 13, 2023 01:33 PM2023-11-13T13:33:51+5:302023-11-13T13:34:29+5:30
वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टमध्ये हा अपघात घडला.
किशोर कुबल, पणजी: गोव्याला भेट देणारे येथे मद्यपान केल्यानंतर नियंत्रणाबाहेर जातात. अनेकदा अपघात घडतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अशाच एका प्रकरणात पुणे येथील एका पर्यटकाने वागातोर येथे मद्यधुंद अवस्थेत कार रिसॉर्टमध्ये घुसवल्याने तेथे उभी असलेली रिसॉर्टची मालकीण ठार झाली.
कोंडवा, पुणे येथिल सचीन वेणुगोपाल कुरुप (वय ४२) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टमध्ये हा अपघात घडला. रिसॉर्टच्या काउंटरजवळ मालकीण श्रीमती रेमेडिया मॅरी आल्बुकर्क (वय ५७) ही उभी असता सचीन याने भरवेगात एचआर-१३- जी-१८३१ क्रमांकाची एसयुव्ही कार तिच्या अंगावर चढवली. या अपघातात ती जागीच ठार झाली तर रिसॉर्टचे अन्य दोन कर्मचारी शिवमंगल दिंडां( २५) व रुपा पारस (३१) किरकोळ जखमी झाले.
अपघाताच्यावेळी सचिन हा मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याला भादंसंच्या कलम ३०४ खाली सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा नोंदवून अटक केली आहे. प्राप्त महितीनुसार सचीन हा आसगांव येथे कासा ब्लांका व्हिल्लामध्ये रहात होता व वागातोर येथे वरील रिसॉर्टमध्ये आपल्या मित्राला भेटायला आला होता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.