गोव्याच्या पर्यटन विकासाला 'डक बोटी'ने मिळणार चालना
By admin | Published: October 16, 2016 02:23 AM2016-10-16T02:23:46+5:302016-10-16T02:23:46+5:30
पाण्यावर आणि जमिनीवर चालणाऱ्या बससदृश डक बोटद्वारे मांडवी नदीतून जलसफर करण्याची कल्पना अखेर गोव्यात आता प्रत्यक्षात आली आहे. विशेष म्हणजे अडीच कोटींच्या
- सदगुरू पाटील, पणजी
पाण्यावर आणि जमिनीवर चालणाऱ्या बससदृश डक बोटद्वारे मांडवी नदीतून जलसफर करण्याची कल्पना अखेर गोव्यात आता प्रत्यक्षात आली आहे. विशेष म्हणजे अडीच कोटींच्या या विशेष वाहनाची निर्मिती गोव्यातच करण्यात आली आहे.
जमिनीवर व पाण्यावरही चालेल असे वाहन गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात लवकरच येईल, अशी घोषणा गेल्या वर्षी सरकारने केली होती. त्या वेळी अनेक गोमंतकीयांना हे अशक्यप्राय वाटले होते. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर डक बोट रस्त्यावरून धावत असल्याचे पणजीकरांनी पाहिले.
रस्त्यावरून धावणारे हेच वाहन थेट मांडवी नदीतही उतरले. पर्यटकांनी डक बोटद्वारे मांडवीतही फेरफटका मारला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, आमदार
नीलेश काब्राल, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांच्यासह निवडक पर्यटकांनी जलसफरीचा अनुभव घेतला.
डक बोटीसाठी अमेरिकेतील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सध्या दोन बोटी तयार करण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सहा महिन्यांपूर्वीच डक बोट तयार झाली होती. मात्र, केंद्र सरकारच्या स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता मिळविण्याच्या प्रक्रियेत सहा महिन्यांचा वेळ गेला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या डक बोटची सर्व प्रकारे केंद्रीय यंत्रणांनी चाचणी केलेली आहे.
पाणी व जमिनीवरही चालणारे वाहन केवळ गोव्यातच आता आलेले आहे. देशात कुठेच अशा प्रकारचे वाहन नाही. गोव्यातच या वाहनाची निर्र्मिती झाल्याबाबत खूप आनंद व अभिमान वाटतो. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पर्यटक मांडवीतील जलसफर अनुभवल्याशिवाय माघारी जाणार नाहीत.
- लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा