'दुधसागर 'प्रश्नी तोडगा काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2024 09:06 AM2024-11-01T09:06:27+5:302024-11-01T09:07:10+5:30
वाहतूकदार भेटले तानावडे यांना
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोव्यातील दुधसागरवरील पर्यटक वाहतूक सध्या ठप्प आहेत. टॅक्सी व्यावसायिक व एकूणच वाहतूकदारांची गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना याची कल्पना काल गुरुवारी आली. ते एक महत्त्वाची बैठक आज शुक्रवारी किंवा येत्या सोमवारी घेणार आहेत.
दुधसागरवर वाहतूक नव्याने सुरू व्हायला हवी, असे गोवा वन विकास महामंडळाला वाटते. मात्र पर्यटकांची वाहतूक करण्याची जबाबदारी ज्या वाहतूकदारांवर आहे, त्यांचा व पर्यटन विकास महामंडळाचा संघर्ष सुरू आहे. जीटीडीसीचे चेअरमनपद हे आमदार गणेश गावकर यांच्याकडे आहे. जीटीडीसीने लागू केलेले शुल्क वाहतूकदारांना मान्य नाही. जरी हे शुल्क पर्यटकांकडून वसूल होणार असले, तरी त्याबाबत वाद आहे. हे शंभर किंवा दीडशे रुपयांचे शुल्क हवे तरी कशाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पर्यटकांची संख्या यामुळे कमी होईल, अशी भीती व्यक्त होते. हा विषय घेऊन काल गुरुवारी माजी मंत्री विनय तेंडुलकर, दीपक प्रभू पाऊसकर व इतरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे यांची भेट घेतली.
संयुक्त तोडगा काढला जाईल
साठ-सत्तर टॅक्सी तथा जीप व्यावसायिकांनी तानावडे यांच्याशी चर्चा केली. आपली कैफियत मांडली. त्यानंतर तानावडे यांनी फोनवरून मुख्यमंत्री सावंत यांच्याशी काल संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांसमोर तानावडे यांनीही प्रश्न मांडला व वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी आपण या विषयात लक्ष घालण्याची व तोडगा काढण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री या विषयाबाबत जीटीडीसी चेअरमन गणेश गावकर यांच्याशी बोलणार आहेत. गावकर यांना सोबत घेऊनच मुख्यमंत्र्यांकडून बैठक घेतली जाणार आहे.