'दूधसागर'ची वाट मोकळी; १६८० पर्यटकांची भेट, कुळे येथील साखळी उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2024 09:00 AM2024-11-04T09:00:39+5:302024-11-04T09:02:15+5:30

एका दिवसात २४० जीपच्या माध्यमातून १६८० पर्यटकांनी भेट दिली आहे.

dudhsagar waterfall tourism starts 1680 visit of tourists | 'दूधसागर'ची वाट मोकळी; १६८० पर्यटकांची भेट, कुळे येथील साखळी उपोषण मागे

'दूधसागर'ची वाट मोकळी; १६८० पर्यटकांची भेट, कुळे येथील साखळी उपोषण मागे

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आपल्या विविध मागण्यांसाठी कुळे येथे उपोषणास बसलेल्या दूधसागर जीपमालक संघटनेच्या सदस्यांनी रविवारी आपले आंदोलन स्थगित केले. त्यानंतर दूधसागर धबधब्याकडे पर्यटकांना जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून काल एका दिवसात २४० जीपच्या माध्यमातून १६८० पर्यटकांनी भेट दिली आहे.

जीपमालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी दूधसागर धबधबा पर्यटन हंगाम रोखून धरलेला होता. एरवी २ ऑक्टोबरला हंगाम सुरू होतो. जो सुरू झाला नव्हता. शनिवारी सरकारने हंगाम सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आणि त्याचवेळी जीपमालकांनी उपोषण घोषित केले. शनिवारी दूधसागर पर्यटनस्थळावर पर्यटक नेण्याचा प्रयत्न होताच जीपमालक आक्रमक झाले व त्यांनी वाहतूक रोखली. परिणामी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली.

साखळी येथे शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. रविवारी सकाळी सर्व जीपमालकांना एकत्रित बोलावून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर हंगाम सुरू करण्याचाही निर्णय घेतला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान दूधसागर वर गोवा पर्यटन महामंडळाच्या मार्फत सर्विस प्रोव्हायडर नेमण्यात आला होता. रविवारी सदर सर्विस प्रोव्हायडर फिरकला नाही, परिणामी गोवा पर्यटन खात्याने नेमलेल्या कर्मचाऱ्यामार्फत दूधसागरवर जीप सोडण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.

एक महिन्याचा अवधी 

संस्थेचे अध्यक्ष वेळीप म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी एक महिना जैसे थे परिस्थितीत हंगाम चालू ठेवण्यासाठी विनंती केली आहे. एक महिन्यानंतर आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दासाठी आम्ही हा हंगाम सुरू करूया. एक महिन्यानंतर जर परिस्थितीत काही बदल झाला नाही तर मग सर्वांना विश्वासात घेऊन पुढे काय करता येईल त्यावर विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: dudhsagar waterfall tourism starts 1680 visit of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.