गोव्यातील 12 खनिज खाणींची मान्यता संपुष्टात; प्रदूषणाचा आयआयटीकडून अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 09:10 PM2017-12-20T21:10:03+5:302017-12-20T21:10:15+5:30
गोव्यातील सोनशी गावातील बारा खनिज खाणींना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले आहेत. यामुळे आता तरी ह्या बारा खाणी चालू शकणार नाहीत. त्यांना नव्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा व जल प्रदूषण कायद्याखाली मान्यता घ्यावी लागेल.
पणजी : गोव्यातील सोनशी गावातील बारा खनिज खाणींना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले आहेत. यामुळे आता तरी ह्या बारा खाणी चालू शकणार नाहीत. त्यांना नव्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा व जल प्रदूषण कायद्याखाली मान्यता घ्यावी लागेल. दुस-याबाजूने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीवेळी मुरगाव पोर्ट ट्रस्टला पत्र लिहावे आणि यापुढे कोळसा वाहतूक ही टार्परेलिनऐवजी स्टीलचे आच्छादन टाकून केली जावी, अशी सूचना करावी असे ठरले आहे.
सोनशीमध्ये एकूण तेरा खनिज खाणी होत्या. त्यापैकी एका खाणीला यापूर्वी कनसेन्ट टू ऑपरेटचे नूतनीकरण करून मंडळाने दिलेले आहे. उर्वरित बारा खाणींचे कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले. त्यामुळे ह्या खनिज खाणी सध्या तरी चालू शकणार नाहीत. बाराही खाणींनी आपल्याला कनसेन्ट टू ऑपरेटचे नूतनीकरण करून मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. मंडळाने अजून त्याविषयी काही निर्णय घेतलेला नाही. सोनशीतील प्रदूषणाचा विषय यापूर्वी न्यायालयात पोहचल्यानंतर सरकारला व प्रदूषण नियंत्रण मंडळाला कडक भूमिका घ्यावी लागली होती. सोनशीतील खाणींना मंडळाने पूर्वी कारणो दाखवा नोटीस पाठवली होती. तथापि, कनसेन्ट टू ऑपरेट रद्द झाल्याने ही नोटीस मंडळाने बुधवारी मागे घेतली आहे.
ओरीसाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ाच्या आधारे 1994 सालच्या ईसींविषयी प्रश्न विचारून मंडळाने राज्यातील 17 खनिज खाणींना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्या नोटीसीला या कंपन्यांनी उत्तर दिले. यापुढे त्या उत्तराच्या अनुषंगाने कोणती भूमिका घ्यावी हे मंडळ ठरवणार आहे. त्यासाठी मंडळाने कायदेशीर सल्ला मागितला आहे.
वास्कोमधील प्रदूषणाच्या विषयावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. बुधवारची बैठक पर्यावरण सचिव दौलतराव हवालदार यांनी घेतली. कोळसा वाहतूक ही प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीने व पूर्णपणो झाकून म्हणजेच टार्परेलिनऐवजी स्टीलचे शीट घालून केली जावी, अशी सूचना मंडळाकडून आता लवकरच मुरगाव बंदराला व कोळसा वाहतुकीशीसंबंधित कंपन्यांना केली जाणार आहे. मुरगाव बंदरात प्रत्यक्ष कोळसा हाताळणी ही पूर्णपणो डोम मध्ये केली जावी, अन्यत्र कुठेच केली जाऊ नये अशी सूचनाही एमपीटीला केली जाणार आहे. सध्या जिंदाल, वेदांता, अदानी आदी कंपन्यांकडून कोळसा वाहतूक व हाताळणी केली जात आहे.
आयआयटीकडून अभ्यास
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई येथील आयआयटीला वास्कोतील प्रदूषणाचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. येत्या मार्चपासून अभ्यासाचे काम आयआयटीकडून सुरू केले जाणार आहे. वास्कोतील प्रदूषण हे नेमक्या कोणत्या कारणास्तव होते, हे आयआयटीकडून शोधून काढले जाणार आहे, असे मंडळाच्या एका अधिका-याने सांगितले.