जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून करणारा संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 08:03 PM2018-03-02T20:03:53+5:302018-03-02T20:03:53+5:30
जमिनीच्या वादातून आपल्या चुलत भावाचा खून करुन गेले सात दिवस फरार असलेल्या हेमंत देसाई याला आज शुक्रवारी पोलिसांनी केरी - सत्तरी येथील दाट जंगलात जेरबंद केले. मडगावपासून 18 किलो. मीटर दूर असलेल्या शेळवण - कुडचडे येथे मागच्या आठवडयात शुक्रवारी 23 फेब्रुवारीला खुनाची ही घटना घडली होती.
मडगाव : जमिनीच्या वादातून आपल्या चुलत भावाचा खून करुन गेले सात दिवस फरार असलेल्या हेमंत देसाई याला आज शुक्रवारी पोलिसांनी केरी - सत्तरी येथील दाट जंगलात जेरबंद केले. मडगावपासून 18 किलो. मीटर दूर असलेल्या शेळवण - कुडचडे येथे मागच्या आठवडयात शुक्रवारी 23 फेब्रुवारीला खुनाची ही घटना घडली होती. संशयिताने सुर्यकांत देसाई (44) याचा खून केला. या खून प्रकरणी हेमंतची आई शेवंती हिला कुडचडे पोलिसांनी अटक केली होती. तर खुनाच्या घटनेनंतर हेमंत फरार झाला होता. काल गुरुवारी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष सायोनारा लाड यांच्या न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही निकालात काढला होता.
सुर्यकांत व हेमंत हे एकाच घरात रहात होते. मात्र त्या दोघांमध्ये जमिनीच्या वाटणीवरुन वाद होता. 23 फेब्रुवारीला घराभोवती कुंपण घालण्याचे काम सुरु केल्याने त्यांचा वाद शिगेला पोहचला याच वादावादीत मयताच्या डोक्यावर लाकडाच्या दंडुक्याने प्रहार केल्याने सुर्यकांत गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात आणले असता त्याला मरण आले होते.
कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हेमंतला केरी - सत्तरी येथे जंगलात पकडले. तो दोडामार्ग परिसरात घनदाट जंगलात रहात होता. हिरो होंडा आय स्मार्ट दुचाकी त्याच्याकडे होती, त्याची नंबरप्लॅट काढून ठेवली होती. दरम्यान शेवंती देसाई हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.