पावसामुळे गोवा-बंगळुरूदरम्यानची वाहतूक 15 तास रखडली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 05:46 PM2019-07-11T17:46:40+5:302019-07-11T17:46:50+5:30
मुसळधार पावसामुळे गोव्याच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे आंतरराज्य वाहतूक कोलमडून पडली.
मडगाव: मुसळधार पावसामुळे गोव्याच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे आंतरराज्य वाहतूक कोलमडून पडली. पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. पावसामुळे गोवा-बंगळुरु वाहतुकीवर अधिक परिणाम झाला.
मुसळधार पावसामुळे कारवारहून 80 किमीवर असलेल्या अंकोला तालुक्यातील रमणगुळी या परिसरात दरड कोसळल्याने तब्बल 15 तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे गोवा-कर्नाटक दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम झाला. दुस-या बाजूने दक्षिण गोव्यातील कुळे परिसरात रेल मार्गावर माती आल्याने वास्कोहून दिल्लीला जाणा-या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. अंकोला येथे पडलेल्या दरडीमुळे बंगळुरुहून गोव्यात येणा-या प्रवासी बसेस सुमारे आठ तास अडकून पडल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्याशिवाय गोव्याकडे येणारी आणि मुंबईकडे जाणारी असंख्य वाहने या मार्गावर अडकून पडली होती.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, पहाटे 3 वाजता ही दरड कोसळली. बंगळुरुहून गोव्यात येण्यासाठी सुटणा-या प्रवासी बसेस सकाळी 7 वाजता रमणगुळी येथे पोहोचतात. मात्र या सर्व बसेस दुपारी 12 वाजेपर्यंत तेथेच अडकून पडल्या होत्या. शेवटी दुपारी 12 वाजता मार्ग खुला केल्यानंतर ही वाहने सोडण्यात आली. सकाळी 11 वाजेपर्यंत गोव्यात पोहोचणारी वाहने त्यामुळे दुपारी 3 वाजता मडगावला पोहोचली.
मुसळधार पावसामुळे वास्को-हुबळी या रस्त्यावरील रेल वाहतुकीतही व्यत्यय आला. कुळे-सावर्डे दरम्यानच्या मार्गावर रेल्वे रुळावर पावसाच्या पाण्याने माती वाहून आल्याने कुळे-वास्को या दरम्यान धावणा-या दोन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या. तर वास्को-चेन्नई, वास्को-निझामुद्दीन आणि हुबळी-निझामुद्दीन लिंक एक्सप्रेस जवळपास तीन तास उशिरा सोडण्यात आल्या.
दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, दुपारी 2.30 वाजता वास्कोहून सुटणारी चेन्नई एक्सप्रेस 4.30 वाजता, दुपारी 3.10 वाजता वास्कोहून सुटणारी निझामुद्दीन एक्सप्रेस सायंकाळी 5.10 वाजता तर दुपारी 4.15 वाजता हुबळीहून सुटणारी हुबळी-निझामुद्दीन लिंक एक्सप्रेस गाडी सायंकाळी 5.45 वाजता सोडण्यात आली. मुसळधार पावसामुळे इतर गाडय़ांचेही वेळापत्रक कोलमडले होते. काही गाडय़ा चार तास, काही गाडय़ा पाच तास उशिरा धावत होत्या.
कुशावतीला पूर आल्याने पारोडय़ातील रस्ता पाण्याखाली
बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे कुशावती नदीला पूर आला असून पारोडा रस्ता पूर्णपणो पाण्याखाली गेल्याने कुडचडे-मडगाव येथील वाहतुकीवर परिणाम झाला. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. गुरुवारी पहाटेच पारोडेचा रस्ता पाण्याखाली गेल्याने मडगावहून कुडचडेच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली. हा मार्ग बंद झाल्याने त्याचा सर्वात जास्त फटका नोकरदारांना आणि शाळेत जाणा:या विद्याथ्र्याना बसला. रस्ता बंद झाल्याने मडगाव-सांगे मार्गावरील काही प्रवासी बसेस बंद ठेवल्याने प्रवाशांना त्रस सोसावा लागला. कुशावतीला पूर आल्याने पारोडा भागातून अवेडे येथे जाणारा रस्त्यावरील पूलही पाण्याखाली गेल्याने या भागातील शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. केपे भागातही कुशावतीचे पाणी वर चढल्याने दत्त मंदिराच्या बाजूला नदीच्या ठिकाणी असलेल्या पाय-या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूकही मंद झाली होती.