सेन्सरमुळे बोंबाबोंब; गोव्यात 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:24 PM2019-04-09T21:24:04+5:302019-04-09T21:24:20+5:30
गोव्याचे तापमान ४७ अंश सेल्सीएस एवढे वाढल्यास काय होईल असे विचारल्यास त्यावर भरभरून लिहिता येईल. मोठी समस्या निर्माण होईल. ती जागतीत बातमीही होईल. पण..
पणजी - गोव्याचे तापमान ४७ अंश सेल्सीएस एवढे वाढल्यास काय होईल असे विचारल्यास त्यावर भरभरून लिहिता येईल. मोठी समस्या निर्माण होईल. ती जागतीत बातमीही होईल. हवामान खात्याच्या स्वयंचलीत हवामान नोंदणी यंत्रणेनुसार गोव्याचे तापमान मंगळवारी ४७ अंश सेल्सीएस एवढे होते. अर्थात सेन्सर नादुरुस्त झाल्यामुळे ही चुकीची माहिती नोंद झाल्याचे नंतर उघढकीस आल्यामुळे केंद्राने ते बदलण्यासाठी तात्काळ हालचाली सुरू केल्या.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाची माहिती देणारी स्वयंचलीत यंत्रणे आहेत. वाळपई, जुने गोवा, काणकोण व वास्को या ठिकाणची माहिती आपोआप वेबसाईटवर अपडेट होत असते. परंतु या हवामान केंद्रांत बसविण्यात आलेले सेन्सर नादुरुस्त झाल्यामुळे चुकीची माहितीही लोकांना मिळत आहे असे दिसून आले आहे. तामान ४० अंश सेल्सीएसपेक्षा अधिक वाढलेले दाखविण्याचे प्रकारही होत आहेत. सोमवारी तर ते ४७ अंश सेल्सीएस एवढे दाखविण्यात आले आहे.
पणजी वेधशाळेचे संचालक म्हणून नव्यानेच ताबा घेतलेले कृष्णमूर्ती पडगलवार यांनी या सर्व केंद्रांची पाहाणी करून यंत्रणे सुधारण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंचलीत तापमानाचा वेध घेणारे सेन्सर नादुरूस्त झालेले आढळून आले आहेत. हे सेन्सर तसे जुनेही होते. सेन्सर एक दोन महिन्यात नवीन बसविले जातील अशी माहिती पडगलवार यांनी दिली. पडगलवार हे स्वत: तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ आहेत. त्यामुळे केंद्राचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी सर्व उपकरणांची पाहाणी केली. त्यात त्यांना अनेक उपकरणाचे सेन्सर नादुरूस्त झाल्याचे आढळून आले. ते काढून बदलण्यासाठीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेन गेज यंत्रही नादुरुस्त झाले असून तेही बदलण्यात येणार आहे.