पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुर्वेदाला देशात अच्छे दिन: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:11 AM2023-12-03T11:11:20+5:302023-12-03T11:13:01+5:30
गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्राचा त्रिदशकपूर्ती सोहळा.
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गेल्या ६० वर्षांत पूर्वीच्या केंद्र सरकारने आयुर्वेदाच्या विकासाच्या दृष्टीने कोणतीच पावले उचलली नाहीत. मात्र, २०१४ सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाच्या प्रगतीसाठी आयुष मंत्रालय सुरू केले. तेव्हापासून आयुर्वेदाला चांगले दिवस आले. पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळेच आयुर्वेदाला चांगले दिवस आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भारतीय संस्कृती प्रबोधिनी शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्राचा त्रिदशकपूर्ती सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष शिरोडकर तसेच भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर शिरोडा पंचायतीच्या सरपंच मुग्धा शिरोडकर, माजी विद्यार्थी मंचचे निमंत्रक डॉ. महेश वेर्लेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुरा बाळे, संस्थेचे सचिव गजानन बखले उपस्थित होते.
सुभाष शिरोडकर म्हणाले, गोव्यात महाविद्यालय सुरू होऊन ते यशस्वीरीत्या चालावे, असे स्वप्न बखले यांनी पाहिले होते. ते आज साकार झालेले आहे. गेल्या ३० वर्षापूर्वी बखले व अन्य लोकांनी हे महाविद्यालय उभे करण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. आपला गोवा निसर्गाबाबत तसेच आरोग्याबाबतही सुंदर व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. भारताबरोबरच जगालाही आरोग्याची सेवा करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संदेश प्रभुदेसाई, अनंत बखले यांच्यातर्फे मंगला बखले, लक्ष्मी पाटील, कालिंदी सहकारी, मार्था रुजारियो वाज, पी के घाटे, अनुरा बाळे, डॉ. स्नेहा भागवत, महेश वेर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुग्धा शिरोडकर, डॉ. महेश वेर्लेकर यांनी आपले विचार मांडले. तसेच कार्यक्रमात नरेंद्र सावईकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विकासाच्या दृष्टीने पायाभरणी करायला हवी
२५ वर्षांत आयुर्वेद आणि होमिओपॅथी कुठे असायला पाहिजे, याचा विचार आताच करून विकासाच्या दृष्टीने पायाभरणी करायला हवी. आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालय बंद पडले तर ते पुन्हा सुरू करणे अत्यंत कठीण होऊन जाईल, राज्यातील अन्य महाविद्यालयांबरोबर शिरोडा येथील आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाला शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय मी घेतला आहे. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री