वाहतूक शिस्तीमुळे मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात अपघाती मृत्यूत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 04:16 PM2019-02-17T16:16:41+5:302019-02-17T16:17:02+5:30
मडगाव - वाहतूक नियम भंग करणा-यांवर कडक कारवाईचे सत्र पोलिसांनी आरंभविल्याने गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयात अपघाताच्या घटनेतही घट ...
मडगाव - वाहतूक नियम भंग करणा-यांवर कडक कारवाईचे सत्र पोलिसांनी आरंभविल्याने गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयात अपघाताच्या घटनेतही घट झाल्याचे आढळून आले असून, मागच्या वर्षी 2018 साली दक्षिण गोव्यात अपघाती मृत्यूच्या 92 घटना घडल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. 2017 साली या जिल्हयातील विविध ठिकाणी अपघाती मृत्यूच्या एकूण 121 घटना घडल्या होत्या. वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी पोलिसांनी वाहन नियमाचा भंग करणा-यांवर कडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. याचा परिणामही आता दिसत असून, अपघाताच्या घटनाही कमी होउ लागलेल्या आहेत.
मागच्या वर्षी अपघाती मृत्यूच्या एकूण 92 घटना घडल्या तर अन्य अपघाताच्या एकूण 215 घटनांची नोंद झाली असून, त्यातील 210 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. 92 अपघाती मृत्यू पैकी सर्वात जास्त 20 अपघाती मृत्यू मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याच्या हददीत घडलेले आहेत. तर फोंडा येथे पंधरा, वेर्णा चौदा, वास्को 9, फातोर्डा 12, व इतर अन्य ठिकाणाच्या पोलीस हददीत घडलेले आहेत.
भरवेगाने व निष्काळाजीपणे वाहने हाकल्याने तसेच दारुच्या नशेत वाहने चालविल्याने जास्त अपघात घडले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. 2016 साली जिल्हयात 132 अपघाती मृत्यूच्या घटनेंची नोंद झाली होती. तर 317 किरकोळ अपघात झाले होते. तर 2015 साली 128 अपघाती मृत्यूंची नोंद पोलीस दफ्तरी आढळून येत आहे. त्यावेळी किरकोळ अपघाताची आकडेवारी 343 इतकी होती. 2014 साली 107 अपघाती मृत्यूची नोंद असून, 297 अन्य अपघात आहेत.
2013 साली 88 अपघाती मृत्यू घडले होते.व 230 अन्य अपघात घडले होते. तर 2012 साली दक्षिण गोवा जिल्हयात 91 अपघाती मृत्यू व 296 किरकोळ अपघाताची नोंद पोलीस दफ्तरी नोंद आहे.