स्मार्टसीटीच्या नावे पणजीत धूळ प्रदूषण, लोकांची हायकोर्टात धाव
By वासुदेव.पागी | Published: March 20, 2024 04:28 PM2024-03-20T16:28:38+5:302024-03-20T16:29:45+5:30
स्मार्ट सीटीच्या कामातील नियोजनशून्यतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
वासुदेव पागी,पणजी : पणजी स्मार्टसीटी बनविण्याच्या नादात शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण केल्याचा आणि यातून दिलासा देणारी कामे सरकारला करण्यास भाग पाडण्याची याचना करणाऱ्या दोन जनहीत याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर झाल्या आहेत.
स्मार्ट सीटीच्या कामातील नियोजनशून्यतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचेही याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकार आणि इमॅजीन पणजी स्मार्ट सीटी डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन (आयपीएससीडीएल) तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी योग्य आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आयपीएससीडीएल, राज्य सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. मंगलवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
दोन्हीही याचिकेत धूळ प्रदूषणावर अधिक भर देताना न्यायालयाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या धूळप्रदूषणाची मात्रा किती आहे ते मोजण्यासाठी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी रिअल टाईम बेसीस एअर अँम्बीट क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे असेही याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे परिस्थितीची जाणीव लोकांना होऊ शकेल. कारण सध्या जे काही चालले आहे ते पणजी वासियांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार आहेत असेही याचिकेत म्हटले आहे.