गोव्यात ड्युटीवरील पोलिसांना खासगी कामासाठी फोन वापरण्यास बंदी, पोलीस मुख्यालयातून आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 10:09 PM2017-11-09T22:09:35+5:302017-11-09T22:15:53+5:30
फिल्डवर काम करणा-या पोलिसांनी ड्युटीच्यावेळी खासगी कामासाठी फोनचा वापर करू नये असा आदेश पोलीस मुख्यालयातून काढण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणा-यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
पणजी: फिल्डवर काम करणा-या पोलिसांनी ड्युटीच्यावेळी खासगी कामासाठी फोनचा वापर करू नये असा आदेश पोलीस मुख्यालयातून काढण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणा-यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी ड्युटीवर नेमलेल्या पोलिसांना विशेष आचार संहिता लागू करण्यात आली आहे. बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि इतर कामासाठी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणा-या पोलिसांना ड्युटीवर असताना फोन वापरता येणार नाही. फोन वापरलाच तर तो खात्याच्या कामासाठीच वापरला पाहिजे. खाजगी कामासाठी तो वापरता येणार नाही असा आदेश त्यांना देण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी विशेष पथक नेमण्याचाही खात्याचा विचार आहे. ही नवीन आचारसंहिता कुणी पोलीस भंग करताना आढळलाच तर त्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे.
सार्वजनिक ठिकाणी नेमण्यात आलेले पोलीस नेहमी मोबाईलवर असतात, मेसेजिंग करीत असतात, कामावर लक्ष्य देत नाहीत अशा तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले.
दरम्यान, या निर्णयामुळे पोलिसांत मात्र नाराजी आहे. सुक्याबरोबर ओलेही जाळले जाते तसा हा प्रकार असल्याची प्रतिक्रियाही काही पोलीस व्यक्त करतात. काम करताना जे कुणी मोबाईलवर खेळ करीत राहतात त्या अवघ्या लोकांसाठी सर्वांवरच निर्बंध लादणे चुकीचे होणार आहे. पोलीसही माणूस आहे आणि त्यालाही घरदार आणि कुटुंब आहे. काहीवेळी आणिबाणीसारखी परिस्थिती उद्भवल्यास घरूनही अत्यंत महत्त्वपूर्ण फोन येत असतात. असे निर्बंध घालून कार्यक्षम व प्रामाणिक पोलिस कर्मचा-यांची मने दुखावली गेली आहेत असे एका पोलिसाने लोकमतशी बोलताना सांगितले.