गोव्यात लीज क्षेत्रे, बंदर, जेटींवर असलेल्या 50 लाख टन लोह खनिजाचा ई लिलाव आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 07:19 PM2019-08-21T19:19:15+5:302019-08-21T19:19:17+5:30
५0 लाख ३४ हजार टन लोह खनिजाचा ई लिलाव आज होणार असून, खाण खात्याने त्यासाठीची सर्व तयारी केली आहे.
पणजी : ५0 लाख ३४ हजार टन लोह खनिजाचा ई लिलाव आज होणार असून, खाण खात्याने त्यासाठीची सर्व तयारी केली आहे. हा लिलाव झाल्यानंतर काही प्रमाणात खनिज वाहतूक सुरू होईल. २0१७ नंतर खनिजाचा ई लिलाव झाला नव्हता. त्यानंतर आता लिलाव होत आहे, असे खात्याचे संचालक आशुतोष आपटे यांनी सांगितले. खाण खात्याने वेगवेगळी लीज क्षेत्रे, बंदर, जेटी तसेच अन्य मिळून २३0 ठिकाणी असलेले खनिज या ई लिलावांसाठी निश्चित केले आहे. ५८ पासून ६५ ग्रेडपर्यंतचे खनिज यात आहे. प्रती टन ४00 रुपये मूळ दर निश्चित करण्यात आला असून कंपन्या आपली बोली लावणार आहेत.
मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनतर्फे हा ई लिलाव होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात २२ ऑगस्टपासून ई लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जाहीर केले होते. तसेच डंप मायनिंगही हाताळून येत्या ऑक्टोबरपासून खनिज व्यवसाय सुरू करू. खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका सादर केली जाईल, अशा घोषणाही त्यांनी खाण खात्याचे मंत्री या नात्याने केल्या होत्या. न्यायालयीन मार्गाबरोबरच खाण प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यासाठीही सरकार प्रयत्नरत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय बैठक याआधी खाण प्रश्नावर झालेली आहे. शहा हे योगायोगाने आज गुरुवारी गोवा दौ-यावर येत असून त्यांच्यासमोर आजही हा विषय येऊ शकतो. खाण कंपन्यांनी कळ सोसावी, कामगारांना कामावरून काढू नये, असे आवाहन करताना ज्या कामगारांना मार्च २०१८ नंतर कामावरून काढून टाकलेले आहे, त्यांच्यासाठी येत्या ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दीड वर्षाच्या कालावधीसाठी आर्थिक पॅकेजही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे. दरमहा ५ हजार रुपये या कामगारांना देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.