गोव्यात खनिजाच्या इ-लिलावांचा फज्जा; अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 07:38 PM2020-05-31T19:38:30+5:302020-05-31T19:40:42+5:30
केवळ ७ टक्केच विकले गेले
पणजी : गोव्यातील खाणी सुरु करा असा रेटा खाण व्यावसायिक तसेच सरकारकडून लावला जात असला तरी प्रत्यक्षात खनिजाला मागणी नाही. लीज क्षेत्रे, बंदर, जेटींवर असलेल्या खनिजाच्या इ लिलांवास अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून विक्रीस काढलेल्या खनिजापैकी केवळ ७ टक्के विकले गेले.
लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आधीच आर्थिक मंदी आहे शिवाय आता पावसाळा सुरु होणार असल्याने निर्यातही शक्य होणार नाही. खाण खात्याने २७ मे रोजी २0 लाख ५0 हजार टन खनिज इ लिलांवात विकायला काढले होते. पैकी केवळ १ लाख ७0 हजार टन विकले गेले. एकूण १३ खाण कंपन्यांनी या इ लिलांवात भाग घेतला.
पाळी, रिवण, कुळें, अडवलपाल येथे ५८ पासून ६५ ग्रेडपर्यंतचे खनिज भूखंडांमध्ये ठेवलेले आहे. जेटींवर तसेच वेगवेगळ्या भूखंडांमध्ये असलेले हे लोहखनिज २0१२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारी मालकीचे बनलेले आहे आणि सरकार त्याचा वेळोवेळी इ लिलाव करीत आहे. वेगवेगळ्या जेटींवर आणि भूखंडांवर १५ दशलक्ष टन खनिज आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या खनिजाच्या इ लिलावांत ५0 लाख ३0 हजार टन खनिजापैकी केवळ ३२ टक्के खनिजमाल विकला गेला.
दरम्यान, रॉयल्टी भरलेले सुमारे १0 लाख ५0 हजार टन खनिज आहे. या खनिजाची वाहतूक खाण कंपन्यांनी सुरु केलेली आहे. तसेच सुमारे ७0 लाख ७0 हजार टन खनिज असे आहे, ज्याची रॉयल्टी भरलेली नाही.