गोव्याच्या विकासाला अस्थिरतेचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:21 AM2018-05-14T03:21:45+5:302018-05-14T03:21:45+5:30
गोव्याच्या विकासाला अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत ४0 पैकी ३५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाला निवडून द्या
पणजी : गोव्याच्या विकासाला अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत ४0 पैकी ३५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाला निवडून द्या, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केले. दोनापावल येथे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शहा यांनी गोव्यातील भाजपा बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही जागा भाजपालाच मिळायला हव्यात यासाठी तयारीला लागा, असे आवाहन शहा यांनी केले. गोव्याचा खाणबंदीचा प्रश्न कोर्टाच्या माध्यमातूनच सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रात संरक्षणमंत्री असताना केलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
भाजपा कर्नाटकात पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, भाजपाचे संघटन विशिष्ट अशा विचारधारेला समर्पित आहे. भाजपाकडे आज ११ कोटी सदस्य आहेत. देशभरातून लोक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत आणि कर्नाटकातही निवडणूक निकालातून त्याचा प्रत्यय येईल. देशभरात सर्वाधिक १८00 आमदार भाजपाकडेच आहेत. ३३0 खासदार असलेला हा सर्वात मोठा पक्ष आहे.
काँग्रेसने एवढी वर्षे सत्ता उपभोगली; पण तब्बल १९ हजार गावांमध्ये ते वीज देऊ शकले नाहीत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आज एकही गाव विजेविना नाही. काँग्रेसच्या कारकिर्दीत हे का घडले नाही याचे उत्तर राहुल गांधी देऊ शकतील काय? ५0 कोटी जनतेचे बँकेत खातेच नव्हते. ३१ कोटी लोकांना भाजपाने खाती उघडून दिली. ५0 लाख लोकांना वीज दिली. ६0 कोटी लोकांना शौचालये दिली. आता ५ लाख रुपयांचा आरोग्य विमाही भाजपा सरकारने जाहीर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.