कॅसिनोवर छापा टाकणारे ईडी अधिकारीच नजरकैदेत; बाऊन्सरनी घेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 08:06 IST2024-12-13T08:05:37+5:302024-12-13T08:06:27+5:30
पणजी पोलिसांची धाव; अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल.

कॅसिनोवर छापा टाकणारे ईडी अधिकारीच नजरकैदेत; बाऊन्सरनी घेरले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मांडवी नदीतील एका कॅसिनोवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना सक्तवसुली (ईडी) कॅसिनोमधील बाउन्सरने नजरकैदेत ठेवले होते. याबाबत माहिती मिळताच पणजी पोलिस धाव घेत कॅसिनोमध्ये दाखल झाले.
बुधवारी ईडीच्या बंगळुरू विभागीय कार्यालयातून काही अधिकारी गोव्यात दाखल झाले होते. संध्याकाळी मांडवीतील एका प्रसिद्ध कॅसिनोवर त्यांनी छापा टाकला. हा छापा नेमक्या कोणत्या कारणासाठी होता याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. कॅसिनोत घुसलेल्या ईडी अधिकाऱ्यांशी कसिनो मालकाने हुज्जत घातली. त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. उलट कसिनोमधील बाऊन्सरना आदेश देऊन ईडी अधिकाऱ्यांच्या हालचालींवर मर्यादा आणल्या.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी बसवून ठेवण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची झाडाझडती घेण्यास प्रतिबंध करण्यात आला. दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच गुरुवारी दुपार पर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची मोकळीक देण्यात आली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना नाईलाजाने पोलिसांना मदतीला बोलवावे लागले. दरम्यान, कॅसिनोमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी पणजी पोलिस स्थानकात येऊन कॅसिनोविरुद्ध तक्रार नोंद केली आहे. ईडीचे विभागीय उपसंचालक उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना शिवीगाळ
ईडीचे अधिकारी कॅसिनोत गेल्यावर त्यांना कसिनो मालकाने शिवीगाळ केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी पणजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच 'तुम्ही आमचे काहीच बिघडू शकणार नाहीत', अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नोंद केले आहे.